कोंकण एक्सप्रेस
वेंगुर्ले तालुक्यातील ’ कर्तृत्ववान महिलांचा ९ रोजी सन्मान*
जागतिक महिला दिनाचे औचित्य भाजप, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे आयोजन प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची माहिती
वेंगुर्ले : प्रथमेश गुरव
महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता येथील भाजप कार्यालयात वेंगुर्ले तालुक्यातील १० कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी दिली.महिलांच्या कामगिरीचा सन्मान आणि लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी ८ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. खी पुरुष समानतेचा पुरस्कार करतानाच वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेंगुर्ल्याच्या गौरवात भर घालणाऱ्या निवडक दहा महिलांचा सन्मान करून वेंगुर्ल्यात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे.
संगीत अलंकार ही संगीत क्षेत्रातील मानाची पदवी प्राप्त करून आपण मिळविलेले ज्ञान नवीन पिढीपर्यंत हस्तांतरीत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून झटत असलेल्या होडावडे गावच्या रहिवासी सौ. विणा हेमंत दळवी, कोकणचा निसर्ग आणि इकॉनॉमी यांचा उत्तम सांगड घालत काथ्या उद्योगासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कुशेवाडा येथील रहिवासी सौ. रुची राजाराम राऊळ, नाट्य क्षेत्रात १२०० हून अधिक संगीत, सामाजिक, एतिहासिक, पौराणिक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मातोंड गावच्या रहिवासी सौ. मिताली महेंद्र मातोंडकर व फोटोग्राफीसारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या वजराट गावच्या रहिवासी सौ. स्मिता शंकर कासले यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
दशावतार ही आजपर्यंत पुरुषांचा एकहाती अमंल असलेली लोककला आहे. दशावतारातील संगीत क्षेत्रात कोणी महिला उतरेल याचा विचारही कोणी केला नसेल, मात्र खानोली गावातील भाविका लक्ष्मण खानोलकर या महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीने पखवाजवादानात कौशल्य प्राप्त करून दशावतारात दमदार प्रवेश केला आहे. दशावतारात पखवाज करणारी ती पहिली व एकमेव महिला ठरली आहे. त्यामुळे तिचाही सन्मान करण्यात येणार आहे.
थाई बॉक्सिंगक्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली उभादांडा येथील योगा प्रशिक्षक मारिया आशिष अल्मेडा, संगीत क्षेत्रातील शिक्षण घेऊन चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाची जादू दाखविणारी उभादांडा गावची सुकन्या अमृता श्रीकृष्ण पेडणेकर, खर्डेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच मुंबई विद्यापीठस्तरीय विविध अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करणारी रामघाट वेंगुर्ले येथील गायत्री राजाराम कासले, एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेली दाभोली गावची सुकन्या आराधना अमृत कुंडेकर व दिव्यांग असूनही दिव्यांग महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय काम गिरी करणारी सोशल मीडियावर अॅक्टिव असलेली तुळस कुंभारटेंब येथील प्राजक्ता माळकर उर्फ जपा यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
मान्यवरांच्या हस्ते या दहाही महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. भाजपच्या वेंगुर्लेतील कार्यालयात सकाळी १०.३० वाजता हा महिला सन्मान सोहळा होणार आहे. वेंगुर्लेवासीयांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी केले आहे.