*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली पदर प्रतिष्ठानच्यावतीने महिला दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पदर महिला प्रतिष्ठानतर्फे यंदाही जागतिक महिला दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी 7 व 8 मार्च या दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्त 7 मार्च रोजी पारंपरिक पदार्थांची पाककला स्पर्धा होणार असून, यावर्षी स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक पदार्थ असणार आहे. ज्या महिला सहभागी होणार आहेत. त्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता आपले पदार्थ सादर करायचे आहेत. या स्पर्धेत महिलांचा सृजनशीलतेला वाव मिळणार असून, त्यासोबतच जुन्या परंपरांना नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच संगीत खुर्ची, रस्सीखेच, दोरी उडी, बादलीत बॉल टाकणे यासारख्या फनी गेम्सच्या माध्यमातून महिलांना मनमुराद आनंद घेता येणार आहे.
8 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता फॅशन शो आणि विशेष सत्कार सोहळा, महिलांसाठी आकर्षक मिस साज सखी आणि मिसेस साज सखी हा फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आत्मविश्वासाला नवा उजाळा मिळणार आहे. याशिवाय, कणकवली शहराच्या नावलौकिकासाठी विशेष योगदान दिलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या कायार्ची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठानतर्फे गौरविण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रम आणि लकी ड्रॉची मेजवानी या विशेष सोहळ्यात स्वागतगीत, गणेश वंदना, नाटिका आणि रेकॉर्ड डान्स यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम रंगत आणतील. तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे उपस्थित महिलांना आनंदाची आणखी एक संधी मिळणार आहे. या कार्यक्रमांना सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मेघा गांगण यांनी केले आहे.