शेती, शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय योजना करा.

शेती, शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय योजना करा.

*कोंकण एक्सप्रेस*

*शेती, शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय योजना करा…*

*भारतीय किसान मोर्चाची मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..*

*सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी*

वन्य प्राणी वनविभागाच्या हद्दीत सुरक्षित राहतील अशी उपाययोजना करावी. शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेती क्षेत्रात कोणताही वन्यप्राणी आल्यास त्याचा बंदोबस्त करण्याचा सर्वाधिकार शेतकऱ्यांना देण्यात यावा, शेतकऱ्यांची शेती व शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याबाबत तात्काळ उपाययोजना करावी. या मागणीसाठी आज भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आमची मागणी मान्य करा-तुमचे प्राणी घेऊन चला, वन्य प्राण्यांचे करायचं काय खाली डोके वर पाय, भारत माता की जय, शेतकऱ्या जागा हो संघर्षाचा धागा हो, आदि गगनभेदी घोषणांनी सिंधुदुर्गनगरी दणाणून सोडत भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा मंत्री अभय भिडे, उपाध्यक्ष सूर्यकांत कुंभार, कोषाध्यक्ष रामकृष्ण पंतवालावलकर, महिला प्रमुख स्वाती पिंगुळकर, कुडाळ तालुकाध्यक्ष जयराम परब, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पांडुरंग हळदणकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष युवराज ठाकूर, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण धुरी, विश्वास सावंत, भूषण बांबार्डेकर, प्रांत प्रतिनिधी प्रमोद लांगी यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी भारतीय किसान संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि वन्य प्राण्यापासून होणारा त्रास याकडे शासनाचे लक्ष वेधले आहेत.

यामध्ये त्यांनी वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्याला जीवन जगणे असह्य झाले आहे, तरी आपल्याकडून वन्य प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास सिंधुदुर्गातील शेती आणि शेतकरी जगू शकणार नाही. जिल्ह्याच्या शाश्वत विकासाला कायमची खीळ बसेल, त्याचा दुष्परिणाम आर्थिक सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीवर होणार आहे. तरी वन्य प्राणी वनविभागाच्या हद्दीत सुरक्षित राहतील अशी आवश्यक सर्व प्रकारचे उपयोजना वनविभाग व शासनाने करावी. कोकण व मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्हा याचा भौगोलिक दृष्ट्या वेगळा विचार करून त्यानुसार नियमात बदल करण्यात यावे. शेतमाल संरक्षणाचा अधिकार लक्षात घेऊन व्यक्तिगत मालकीच्या शेती क्षेत्रात कोणताही वन्य प्राणी आल्यास त्याचा कोणत्याही प्रकारे बंदोबस्त करण्याचा सर्वाधिकार शेतकऱ्यांना देण्यात यावा व अशावेळी शेतकऱ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ नये. वानर, माकड, शेकरू, गवारेडा, सांबर, हत्ती, नीलगाई, मोर, डुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची तक्रार करण्यासाठी पिक विमा योजनेच्या धर्तीवर टोल फ्री क्रमांक उपलब्ध करावा तसेच नुकसान ग्रस्त शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून वनविभाग व शेती विभागाने तात्काळ पंचनामा करावा. ७२ तासाच्या आत पंचनामा न झाल्यास शेतकऱ्यांनी नमूद केलेले नुकसान ग्राह्य धरून सदर शेतमालाच्या बाजारभावाच्या दुप्पट नुकसान भरपाई द्यावी. तसेच नुकसानीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर ठराविक मुदतीत जमा करावा. शासनाने तयार केलेल्या अन्नसुरक्षा कायद्यान्वये शेतकऱ्यांची शेती व शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याबाबत त्वरित उपाययोजना करावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!