कोंकण एक्सप्रेस
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत करूळ गावातील १२ घरकुलांचे भूमिपूजन
वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांच्या शुभहस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत सोमवारी एकाचदिवशी करूळ गावातील १२ घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांच्या शुभहस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम, माजी सरपंच हिंदुराव पाटील, सह्याद्री जीव रक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, बबन डकरे, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य भास्कर सावंत, रेखा सरफरे, पोलीस पाटील सचिन पाटील, उदय कदम, सुभाष पाटील, सत्यवान पाटील, लाभार्थी सदानंद पाटील, संतोष पाटील, शशिकांत पाटील, काशिनाथ सावंत, भास्कर उर्फ भाई सावंत व इतर लाभार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये करूळ गावातील १५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. २२ फेब्रुवारी रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील २० लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप व पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात मंजूर पत्र वितरित कार्यक्रम संपन्न झाला होता.
करुळ येथे एकाच दिवशी १२ घरकुल बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. सदर घरकुलांच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. यावेळी लाभार्थी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. लाभार्थी व ग्रामपंचायत यांच्या वतीने गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रामचंद्र जंगले म्हणाले, मंजूर घरकुलांचे मुदतीत बांधकाम पूर्ण झाले पाहिजे. यापूर्वी एक ते दोन घरांना शासनाकडून मंजुरी मिळत होती. परंतु केंद्र व राज्य शासनाने एकाच टप्प्यात बहुतांश घरांना मंजुरी देऊन लाभार्थ्यांना मोठा आधार दिला आहे. करुळ गावातील लाभार्थी येत्या दोन महिन्यात घरे पूर्ण करतील. व नव्या घरात लवकरच प्रवेश करतील असा विश्वास जंगले यांनी व्यक्त केला.