*कोकण Express*
*इर्टीगा कारला मागून धडक ; मोटरसायकलस्वार जागीच ठार*
*मयत रुपेश नागवेकर पेडणे गोवा येथील रहिवासी*
*मालवण ः प्रतिनिधी*
मारुती इर्टीगा कारला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच गतप्राण झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास देवली सागरी महामार्गावर घडली आहे. रुपेश श्रीधर नागवेकर (वय ४०, रा. आरंबोल पेडणे गोवा) असे मृत मोटरसायकल स्वाराचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार आंब्रड येथील प्रवीण भानुदास राऊळ यांच्या मालकीची मारुती इर्टीगा कार (क्र. एमएच ०७ -एजी २३३१) घेऊन त्यांचे कुटुंबीय मालवणच्या दिशेने नेत होते. दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास देवली सागरी महामार्गावर खोतदुकान नजिकच्या चढावावर पाठीमागून येणाऱ्या (जीए ११ – एफ २१२१) या मोटरसायकल वरील चालकाने इर्टीगा गाडीला मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत कारची मागील काच फुटून मोटरसायकल स्वाराच्या गळ्याला लागून गंभीर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून त्याला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. या अपघातात जागीच मयत झालेल्या मोटरसायकल स्वाराची ओळख पटली नव्हती. मात्र त्याच्याकडे एक कापडी बॅग मिळून आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, सिद्धेश चिपकर यांसह पोलीस पथक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या बॅगेची तपासणी केली असता संबंधित व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन, तसेच एटीएम कार्ड व अन्य कागदपत्रे मिळून आली. यावरून त्याचे नाव रुपेश श्रीधर नागवेकर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडील मोबाईलची बॅटरी उतरल्याने नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नव्हता. पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.