*कोकण Express*
*साखळी उपोषण करणारे ‘ते’ सेनेचेच कार्यकर्ते….*
*अमित इब्रामपूरकर; मनसेचा मच्छीमारांना पाठिंबा,सेनेच्या पुढार्यांना नाही…*
*मालवण ः प्रतिनिधी*
कालपासून साखळी उपोषण करणारे हे शिवसेनेचेच पुढारी असल्याचा हल्लाबोल मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. दरम्यान मनसेचा प्रामाणिक मच्छीमारांना पाठिंबा असून शिवसेनेच्या पुढार्यांना नाही असे श्री. इब्रामपूरकर यांनी स्पष्ट केले आहे.
आज मनसे पदाधिकार्यांनी साखळी उपोषण करणार्या मच्छीमारांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. यावेळी चर्चा करताना उपस्थित काही मच्छीमार बांधवांनी राज ठाकरेंच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. यावेळी पदाधिकार्यांनी मनसे नेते जीजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घडवून आणू असे सांगितले. या चर्चेवेळी शैलेश अंधारी, मनसे तालुका सचिव विल्सन गिरकर, मनविसे उपजिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर, मनविसे शहराध्यक्ष साईनाथ चव्हाण, जयंत कामतेकर, प्रतीक कुबल, विजय पेडणेकर, गुरु तोडणकर आदी उपस्थित होते.
यावेळी इब्रामपूरकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर मच्छीमारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात टीका केली. आज उपोषणास बसलेले कोण आहेत ? त्यांच्याच पक्षाचे लोक आणि पदाधिकारी आहेत. मग आमदारांनी प्रश्न सुटले म्हणून करून घेतलेला सत्कार हा निव्वळ फसवेगिरी आहे आणि जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे. एका बाजूने आमदारांचा सत्कार करणारे हेच आणि शासनाच्या विरोधात साखळी उपोषणास बसणारे हेच नेमकी तुमची भूमिका काय हे आमदारांनी स्पष्ट करावे. आमदार वैभव नाईक यांनी मच्छीमारांची नेहमीच दिशाभूल केली. मालवणसाठी गस्तीनौका देणार असे जाहीर केले. पण प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी एकच ती पण सडलेली गस्तीनौका देत मच्छीमारांची फसवणूक केली. एलईडी मासेमारी बंद करा असे शासनाचे आदेश आहेत. तरीही आज समुद्रात प्रशासनाच्या आशिर्वादाने एलईडी दिव्यांचा लखलखाट आहे. १ जानेवारी पासून ३१ ऑगस्ट या कालावधीत पर्ससीन जाळ्याने (पर्ससीन जाळी, रींग सीन जाळी, मिनी पर्ससीन जाळी) समुद्र जलधिक्षेत्रात मासेमारी करण्यास बंदी घातलेली आहे. पण आजही पर्ससीन, मिनी पर्ससीन मासेमारी सुरू आहे. मत्स्यविभाग कारवाई करत नाही. आमदार नाईकांचे मत्स्यअधिकारी ऐकत नाही. आमदारांचा प्रशासनावर वचक नाही. ज्या मच्छीमारांच्या एकगठ्ठा मतांमुळे श्री. नाईक दोन वेळा आमदार झाले त्या मच्छीमारांना न्याय देवू शकले नाहीत. म्हणूनच शिवसेनेच्या पुढार्यांना उपोषणास बसावे लागले. त्यामुळे मनसेचा पाठिंबा मच्छीमारांच्या प्रश्नांवर राजकारण करणार्या शिवसेनेच्या पुढार्यांना नसून प्रामाणिक मच्छीमारांना असल्याचे इब्रामपूरकर यांनी सांगितले.