कोंकण एक्सप्रेस
एस.एम. हायस्कूल कणकवली इयत्ता १० वी च्या १९८४ सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन
कणकवली ः प्रतिनिधि
धमाल, मस्ती, खेळ, बरोबरच प्रेमळ, शरारती आणि तेवढ्याच हळव्या आठवणींचा मागोवा यामुळे तारामुंबरी देवगड येथील राजम रिसोर्टचा परिसर हस्यकल्लोळ माजला, निमित्त होते एस.एम. हायस्कूल कणकवली इयत्ता १० वी च्या १९८४ सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन ! या संमेलनात मिनी शाळाच भरली होती. हया हरहुन्नरी बॅचचे हे सलग चौथे संमेलन, दरवर्षी आपल्या व्यस्त दैनंदिनीतून मुद्दाम वेळ काढून ही सर्व मंडळी प्रेमाने एकमेकांना भेटायला आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत हया हृदयीचे त्या हृदयी सांगायला खूप लांबून येऊन आवर्जून भेटतात. संमेलनात ही मंडळी आनंद लुटायला आले होते. यामध्ये डाॅ. दिगंबर करंबेळकर, संदीप वालवलकर, रमेश जोगळे, किशोर पटेल, संजय बेलवलेकर, गजानन मुळे, सुशील नलावडे, नूतन मांजरेकर, संगिता तावडे, अनिल राणे, हिमांशु कुलकर्णी, दिलीप पांडव, राजेंद्र गाजरे, वैशाली गाजरे, रियाज शेख, अनिल सावंत, उमेश आम्रडकर, चेतन दळवी, संजीव प्रभुदेसाई, संतोष घोणे, विनय राणे, केतन दळवी, दत्ताराम साटम आदी वर्गमित्र सहभागी झाले होते. मित्रमैत्रिणी हा आनंद लुटण्यासाठी शनिवारी दुपारी वाजेपर्यंत सर्वजण रिसोर्टला एकत्र जमले आणि दुपारच्या रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला. नंतर थोड्या गप्पा मारून सर्व मंडळी बाजूच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेली. तिथे मनसोक्त फेरफटका आणि अर्थातच भरपूर फोटोसेशन करून आणि अथांग समुद्राची गाज हृदयात साठवून सर्व जण गरमागरम कांदाभजी चहाचा आस्वाद घ्यायला रिसोर्टच्या प्रांगणात हजर झाले आणि नंतर खऱ्या अर्थाने सुरु झाला जल्लोष. शालेय आठवणी, किस्से, कराओके गाणी, डान्स, फनी गेम्स यात वेळ कसा निघून गेला ते कळलच नाही. नंतर भोजनाचा आस्वाद घेऊन पुन्हा गप्पांचा फड रंगला तो रात्री २ वाजेपर्यंत. यावेळी काहींचा सन्मानही करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्तानंतर सर्वांनी श्री देव कुणकेश्वरंचे दर्शन घेतले आणि दुपारच्या जेवणानंतर ही सर्व मंडळी हळव्या मनाने, जड अंतःकरणाने आपापल्या घराकडे मार्गस्थ झाली ती पुढच्या गेट टुगेदर ला यायचे असे ठरवूनच.