*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ मधून होणारी अवैध दारु गुटखा वाहतूक रोखा..*
*मनसेचे एक्साइज विभागाला निवेदन…*
*वाहतूक बंद न झाल्यास आंदोलन…*
*कुडाळ : प्रतिनिधी*
गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखावी असे निवेदन महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात अवैद्य वाहतुकीवर कडक स्वरुपाची कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर घंटानाद तथा बोंब मारो आंदोलन करेल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक मिलिंद गुरव यांना निवेदन देत कुडाळ तालुक्यातून अवैधरित्या होणारी दारु, गुटखा व अमली पदार्थांच्या वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पालकमंत्री यांनी आदेश देऊन सुद्धा कारवाई का होत नाही असे विचारल्यावर उत्पादन शुल्क निरीक्षक निरीक्षक यांनी मनुष्यबळ कमी असल्याची हतबलता बोलून दाखवली. यावर मनसेतर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागास रस्त्यावर उतरून सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन देत कुडाळ पोलीस निरीक्षक यांची मदत घेण्याचे सुचविले. तसेच येत्या दहा ते पंधरा दिवसात अवैद्य वाहतुकीवर कडक स्वरुपाची कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर घंटानाद तथा बोंब मारो आंदोलन करेल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतिन माजगावकर, माजी उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, शाखाध्यक्ष नेरुर अनिकेत ठाकुर, अक्षय जोशी, सुरज नेरूरकर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.