कोंकण एक्स्प्रेस
बाजार डे’ चे पत्रकार तेजस देसाई यांच्या हस्ते उदघाटन
दोडामार्ग, २३: प्रतिनिधी
दैनंदिन उपयोगी वस्तू बाजारातून विकत घरी आणल्या जातात मात्र त्यातून विद्यार्थ्यांना देव – घेव समजत नाही. आजच्या पेटीम, गूगल पे मध्ये चलनी व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये यावे यासाठी दोडामार्ग येथील महात्मा गांधी मिशन स्कूलने ‘बाजार डे’ हा उपक्रम घेतला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून पालकांनी उपक्रमाचे कौतुक केले.
या ‘बाजार डे’ चे पत्रकार तेजस देसाई यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका सौ. सुरेखा ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते दिपक बुगडे, शिक्षिका सौ सुप्रिया परिट, सौ. प्रतिमा नाईक,सौ सोनाली नाईक, श्रीम. निवेदिता कर्पे, श्रीम. पुजा परवार, पालक अस्मिता शेटकर, अलका उगाडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. देसाई म्हणाले, शिक्षण पद्धतीत विद्यार्थी – शिक्षक – पालक यांच्यातील संवाद महत्वाचा असतो. जेव्हा सहशालेय उपक्रम घेतले जातात तेव्हा पालक सहभाग महत्वाचा असतो. महात्मा गांधी मिशन स्कूलच्या पालकांची उपस्थिती पाहता शिक्षक – पालक यांच्यातील संवाद चांगला असल्याचे दिसले. विद्यार्थ्यांनी गाव आणि परसबागेत मिळणाऱ्या वस्तू विक्रीसाठी आणून जो सहभाग दर्शवला त्याचे आणि बाजार डे या विशेष उपक्रमाचेही श्री. देसाई यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. समृद्धी पनवेलकर यांनी केले.