निकोप समाज बाईच्या कर्तृत्वाला प्रेरणाच देतो*

निकोप समाज बाईच्या कर्तृत्वाला प्रेरणाच देतो*

*कोकण Express*

*निकोप समाज बाईच्या कर्तृत्वाला प्रेरणाच देतो*

*’21 व्या शतकातील स्त्रियांपुढील आव्हाने’ व्याख्यानात कादंबरीकार उषा परब यांचे प्रतिपादन*

*अमरावती महिला महाविद्यालयातर्फे ऑनलाईन व्याख्यान*

*कणकवली  ः  प्रतिनिधी*

21 व्या शतकात स्त्रिया सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर दिसत असल्या तरी लोकसंख्येच्या प्रमाणात हे प्रमाण फारच कमी आहे.त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा सगळीकडेच उठत असला तरी असा ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढायला हवे. निकोप समाज बाईच्या कर्तृत्वाला प्रेरणाच देतो. त्यामुळे अशा समाजाची निर्मिती करणे ही एकूण समाजाची जबाबदारी आहे. तरच 21 व्या शतकातील स्त्री पुढे गेली असे म्हणता येईल. असे प्रतिपादन सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कादंबरीकार व कवयित्री उषा परब यांनी ’21 व्या शतकातील स्त्रियांपुढील आव्हाने’ या व्याख्यानात केले.
महिला महाविद्यालय अमरावतीतर्फे परब यांचे ’21 व्या शतकातील स्त्रियांसमोरील आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी सौ परब यांनी स्त्रीया आपल्या अधिकाराबद्दल जागरूक होत असल्या तरी पुरुषसत्ताक पद्धतीत त्यांना हवे ते अधिकार अजूनही दिले जात नाहीत.असेही आग्रहाने सांगितले. यावेळी व्याख्यानाच्या संयोजक प्रसिद्ध कवयित्री प्रा.डॉ. शोभा रोकडे उपस्थित होत्या.
सौ परब म्हणाल्या, घटनेने दिलेले स्वातंत्र्य, अधिकार स्त्रियांसाठी महत्त्वाचेच आहेत. सरकारनेही स्त्रियांसाठी नवीन कायदे केले आहेत. स्त्री चळवळीचा पाठिंबा स्त्रियांच्या प्रश्नांना मिळतोच आहे. यामुळे संस्कृत दर्शनी स्त्रियांमध्ये कमालीचा बदल झाल्याचे जाणवत असले तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. स्त्रीयांचे प्रमाण मोठे आहे, त्या तुलनेत स्त्रीयांच्या अत्याचाराला न्याय मिळत नाही. स्पर्धात्मक क्षेत्रात,पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात आज स्त्रियांनी प्रवेश केला आहे. अनेक जणींनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मात्र हे प्रमाण एकूण स्त्रीयांच्या संख्येच्या मानाने फारच कमी आहे.
स्त्रिया आपल्या अधिकाराबाबत जागृत होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडू लागल्या तसतशी त्यांच्यापुढे पारंपारिक आव्हानांबरोबर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. आजच्या आधुनिक प्रगत समाजातही बाईला बंधनात जगावे लागत आहे. कुटुंबात, बाहेर, सामूहिक पातळीवर होणारी हिंसा आणि लैंगिक अत्याचार चिंताजनकच आहेत. त्यात जात धर्म वर्गानुसार स्त्रीयांच्या अत्याचाराचे प्रमाण वेगवेगळे आहे.त्यात मूलतत्त्ववादी शक्तीने अधिकच भर टाकलाय. जागतिकीकरण दहशतवादाच्या होणारा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम स्त्रियांनाच भोगावा लागत आहे. यांच्या उन्नतीसाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिळवणूक विरहीत समाज निर्माण करणे गरजेचे असून समता, शांतता, सुव्यवस्था जेवढी समाजात निर्माण होईल तेवढा फायदा स्त्रियांच्या प्रगतीसाठी होणार आहे. यासाठी दहशतवादी शक्तींचा नायनाट करणारा समाज अपेक्षित आहे. स्त्रियांनीही कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आपला स्वतःची वाट निर्माण करणे गरजेचे आहे.तरच 21 व्या शतकातही आधुनिक स्त्री अधिक प्रगती करू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!