डिजिटल ग्रंथालयांसाठी नियोजनमधून मदत – मंत्री नितेश राणे

डिजिटल ग्रंथालयांसाठी नियोजनमधून मदत – मंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*डिजिटल ग्रंथालयांसाठी नियोजनमधून मदत – मंत्री नितेश राणे*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने गावागावातील प्रत्येक ग्रंथालय डिजिटल बनविण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून तसेच काही उद्योजकांमार्फत डिजिटल ग्रंथालयांना मदत केली जाईल, असे पालकमंत्री तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर ते बोलत होते जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राणे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील १२८ ग्रंथालये व त्यांचे कर्मचारी तसेच ग्रंथालयांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी राणे यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, संचालक अॅड. संतोष सावंत, सचिव राजन पांचाळ आदी उपस्थित होते.

राणे म्हणाले, मी कणकवली ग्रंथालयाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे ग्रंथालयांच्या समस्या मला माहिती आहेत. येथील ग्रंथालये आजच्या युगात दर्जेदार व डिजिटल हवीत. आजची तरुण पिढी पुस्तक वाचायला ग्रंथालयात जात नाही.ग्रंथालयांची वाचक फी वाढवायची तर लोक फी देत नाहीत. अशा स्थितीत तरुण वर्गाला ग्रंथालयांकडे वळवायचे असेल तर प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील पाच ग्रंथालये डिजिटल ग्रंथालये बनवा. त्या ग्रंथालयांना आपण सर्वतोपरी सहकार्य करू. ग्रंथालय कर्मचाऱ्यांची मानधन वाढ तसेच ग्रंथालयांना वाढीव अनुदान व नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मस्के यांनी जिल्ह्यातील ग्रंथालयांना इमारती मिळत नाहीत. प्राथमिक शाळांमधील वर्गखोल्या ग्रंथालये चालविण्यासाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे पगारवाढ व ग्रंथालयांचे अनुदान वाढ होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले. यावेळी राणे यांनी आपण लवकरच सर्व ग्रंथालय अध्यक्ष, संचालकांची एकत्र बैठक घेऊ. डिजिटल ग्रंथालय बनविण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करू, असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी, संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, उदय नाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!