*कोंकण एक्सप्रेस*
*आंगणेवाडी यात्रेसाठी कुडाळ आगार सज्ज*
*कुडाळ : प्रतिनिधी*
आंगणेवाडी येथील भराडी देवीचा यात्रोत्सव शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होत आहे.यानिमित्त कुडाळ एसटी आगार भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. कुडाळ आगारातून या यात्रेसाठी एकूण ३५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. कुडाळ एसटी आगाराच्या एकूण २४, तर सावंतवाडी आगाराच्या एकूण ११ अशा एकूण जादा वाहतुकीसाठी ३५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.
२२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवस या बसेस पहाटेपासूनच सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कुडाळ एसटी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी दिली. प्रसिद्ध आंगणेवाडी येथील यात्रोत्सवासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा मिळावी, म्हणून कुडाळ एसटी आगारातून दरवर्षी जादा वाहतूक व्यवस्था केली जाते. त्यासाठी एसटी प्रशासनाकडून चांगले नियोजन केले जाते.
यात्रोत्सवासाठी लाखो भाविक येतात. मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांना एसटी प्रशासनाकडून चांगली सेवा दिली जाते. त्यातून आगाराला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. बाहेरून येणाऱ्या भक्तांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.