*कोंकण एक्सप्रेस*
*सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावा – शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन*
*प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ नागरिकांना अकारण त्रास*
*कणकवली : प्रतिनिधी*
सोमवार दि. १७/०२/२०२५ रोजी मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची भेट घेऊन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी अधिकृत भेट मिळण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यापूर्वी दोन वेळा चर्चेसाठी आश्वासन दिल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. परंतु चर्चाच झालेली नाही. त्यामुळे प्रश्न वारंवार तसेच राहत आहेत.
दि. २१/०६/२०२२ च्या निवडश्रेणी मंजूर आदेशानुसार अद्यापही ०४ शिक्षकांचे सुधारित निवृत्ती वेतन आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत. ८० निवडश्रेणी प्राप्त शिक्षकांच्या कार्यरत कालावधीच्या फरकासाठी वारंवार शिक्षण विभागाच्या लेखा विभागाकडून वेगवेगळी कारणे सांगितली जातात हे संयुक्तिक वाटत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच तालुक्याकडून ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या एकाच वेळी न सांगता १-१ बाबी विलंबाने सांगण्यात येतात. परिणामी आणखी विलंब करण्यात प्रशासनाला धन्यता वाटते. आता फेब्रुवारी मार्च महिना निघून गेल्या नंतर पुन्हा ती देयके कधी खर्च पडतील ते सांगता येणार नाही.
०१ जुलैच्या काल्पनिक वेतनवाढीसाठी पुन्हा आता नव्याने दीड वर्षानंतर वचनपत्राचा मुद्दा काढण्यात आला. अनेक सेवानिवृत्त शिक्षक वयोवृद्धतेमुळे आपापल्या मुलांकडे पुणे, मुंबई अथवा अन्यत्र निवासासाठी असल्याने ते कार्यालयाकडे कितीवेळा येत राहणार हा प्रश्न आहे. आपल्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठनागरिकांना अकारण त्रास होतो याचा प्रशासन कधीही विचार करीत नाही.
दि. ०१/०१/१९६८ पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करणे, पदवीधर श्रेणीधारक शिक्षकांची सेवाज्येष्ठता सूची अद्यावत करणे, तसेच त्यात काही सुधारणा करणे, सापडत नसलेली सेवापुस्तके शोधणे, आदर्श शिक्षक पुरस्कार पात्र शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देणे, रजा रोखीकरणाचा लाभ देणे, निवृत्ती नंतरचे देय लाभ तात्काळ आदा करणे, विलंबाने आदा करावयाच्या रकमांवर व्याज देणे, अतिप्रदान म्हणून चुकीच्या पद्धतीने वसूल केलेल्या रकमा परत करणे, पेन्शन अदालत इत्यादी प्रश्न देण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाकडून होणाऱ्या आदेशात चुका राहिल्यामुळे शिक्षकांना नाहक अतिप्रदान नसतानाही अतिप्रदान रकमा म्हणून दीड, दोन लाखाची चुकीच्या पद्धतीने वसुली करणे. झालेली चूक त्वरित दुरुस्त केल्यास या गोष्टी थांबू शकतात. जर योग्य ते शुद्धीपत्रक त्वरित काढण्यात आले. तर संबंधित शिक्षकांना न्याय मिळू शकतो व रक्कम वसूल केली गेली असेल तर ती त्वरित परत करण्यात येण्यासारखी आहे. अशी जलद कार्यवाही होईल का? त्यामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांना नाहक कसा त्रास होतो हे चुकीचे आदेश दाखवून पटवून देण्यात आले. यासाठी लवकरात लवकर वेळ मिळून सर्व मुद्यांवर सखोल चर्चा होऊन प्रश्न निकाली निघू शकतात. दि. ०४/१२/२०१८ च्या आदेशाने एका निवृत्त शिक्षकाला दि. ०१/०६/१९९३ च्या पात्र दिनांकाने निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. परंतु ०६ वर्षाचा कालावधी उलटला तरीही त्याला निवडश्रेणीचा लाभ देण्यात आलेला नाही ते वयोवृद्ध शिक्षक वारंवार कार्यालयामध्ये खेपा घालत आहेत. या सर्व बाबींवर लवकर उपाययोजना होण्यासाठी चर्चेची लवकरात लवकर वेळ मिळण्याची शिक्षक प्रतिनिधींनी समक्ष भेट घेऊन विनंती केली.
अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, सोनू नाईक, रमेश आर्डेकर, स्नेहा लंगवे, शिल्पा गावडे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.