*कोंकण एक्सप्रेस*
*शिंदेंची शिवसेना कुंभ स्नानासाठी उद्या प्रयागराजला जाणार; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होणार शक्ती प्रदर्शन*
*मुंबई : प्रतिनिधी*
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करताना उध्दव ठाकरेंना काटशह देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी त्यांच्या सर्व आमदार, खासदार व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रयागराज येथे कुंभस्नान करण्याचा कार्यक्रम आयोजिला आहे. त्यानुसार उद्या १९ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें व आपल्या सर्व शिलेदारांसह प्रयागराजला जाणार आहेत.
तिथले सर्व धार्मिक कार्यक्रम आटोपून साधु-संत महंतांचे आशीर्वाद शिंदे मंत्री आमदार घेणार आहेत.त्यांचा हा कार्यक्रम हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या उध्दव ठाकरेंचे शह देण्यासाठी असल्याचे शिदेंसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबतची अधिक भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नेतेमंडळी प्रभावीपणे मांडतील असेही ते सांगत आहेत.
प्रयागराजचा कार्यक्रम आधी ठरल्यानुसार दोन दिवसांचा होता. परंतु कदाचित तो आणखीन दोन दिवस वाढण्याची शक्यता पदाधिकारी वर्तवित आहेत. यावेळी हिंदुत्वार संत-महंताचे आशीर्वाद घेताना त्यांचेकडून धार्मिक अध्ययनही होईल. तसेच आमदार व खासदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर मोकळा सवांद साधण्याचीही संधी आहे. कुंभस्नानाच्या निमीत्ताने शिंदेंच्या शिवसेनेचे शक्तीप्रदर्शनही दिसेल व उरलेल्या उबाठा सेनेवर दबाव येईल, अशी योजना आहे.
या कुंभस्नाना दरम्यान सुरक्षेत कपात झाल्यामुळे नाराज झालेल्या आमदार व खासदारांची समजूत काढण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें व त्यांचे मंत्री सहज करु शकतील, असे शिंदेसेनेचे नेते सांगत आहेत.

