*कोंकण एक्सप्रेस*
*आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी*
*मालवण : प्रतिनिधी*
जसजशी दुकाने सजायला लागली, तसतसा आंगणेवाडी परिसर फुलून जात आहे. जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. सामाजिक संस्था व विविध पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन जत्रोत्सवात करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सरबत वाटपाच्या कार्यक्रमापासून ते आरोग्य तपासणीपर्यंतचे अनेक सेवाभावी उपक्रम यात्रेत राबविले जातात. यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक होणार असल्याने भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना त्रुटी दूर केल्या जात आहेत. दर्शन रांग लाकडी पूल आणि इतर रांग व्यवस्था काम अंतिम टप्यात आले आहे.
माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून गतवर्षी पूर्णत्वास गेलेल्या सुलभ स्वच्छता गृहामुळे भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. भाविकांना सुविधा देण्या बरोबरच सुरक्षिततेला सुद्धा महत्व देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी नियोजन बैठकीत दिल्याने प्रशासन त्या दृष्ठिने काम करत आहे. जत्रेदिवशी रात्री व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जादा वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे भूमिगत वीज वाहिन्यांसाठी मसूरे ते देऊळवाडा या मार्गालगत मारलेले चर व्यवस्थित बुजविले न गेल्याने यात्रा कालावधीत वाहतूक वाढल्यानंतर अपघात होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.