*कोंकण एक्सप्रेस*
*तेंडोली महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ*
*कुडाळ : प्रतिनिधी*
तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिर येथे आयोजित ‘तेंडोली महोत्सवा’ ला शुक्रवारी सायंकाळी शोभायात्रा व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभझाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गावातील मुलांनी रेखाटलेली विविधारंगी रांगोळी, वेशभूषा व वावळेश्वर दशावतार मंडळाच्या ‘अयोध्याधीश श्रीराम’ या ट्रीक्सीनयुक्त नाटकाने नाट्यरसिकांची मने जिंकली. एकंदरीत विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव यादगार ठरला.16 फेब्रुवारी या महोत्सवाची सांगता होणार आहे.
ग्रामीण भागात प्रथमच सांस्कृतिक, आरोग्यविषक कार्यक्रमांसोबत गावातील महिलांना व लहान मुलांना खुले व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांचा या महोत्सवात महत्वाचा सहभाग आहे. रसिकांना अनोखा आनंद व पर्वणी देणाऱ्या तेंडोली महोत्सवाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे. शुक्रवारी सायंकाळी या महोत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ करण्यात आला. गावातील प्राथमिक शाळेतील सात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी- कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोवरी येथील श्री देव सत्पुरुष, भराडी देवी यांच्या पथकाच्या ढोलवादनाने या यात्रेला रंगत आणली. तसेच शोभायात्रेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा यात्रेत लक्ष वेधून घेत होत्या. तेंडोली ग्रामपंचायत ते श्री देव रवळनाथ मंदिर महोत्सव स्थळापर्यंत उत्स्फूर्त आणि उत्साही वातावरणात यात्रा काढण्यात आली. त्यानंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 21 स्पर्धेक सहभागी झाले होते. स्पर्धेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवामुळे गावातील लोकांचे मनोरंजन होते. तसेच लहान मुलांना एक व्यासपीठ मिळते. गावातील लोकांमध्ये उत्साह एकोप्याची भावना निर्माण होते. आप-आपसातील वाद विवाद विसरुन यनिमत्ताने गावातील सर्वजण एकत्र येतात. त्यामुळे पारंपारिकता जोपासली जाते. तेंडोली सारख्या ग्रामीण भागात महोत्सव राबविणे निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा कार्यक्रमांमधूनच गावातील लोक एकत्र येत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमातूनच त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होत असतो. त्यामुळे अशा महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करणे आवश्यक आहे, असे मान्यवरांनी सांगितले.
महोत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक विजय प्रभू, बांधकाम व्यवसायिक शेखर उर्फ पप्पू नाईक, राजन नाईक, प्रसाद नाईक, राजू राऊळ, सरपंच अनघा तेंडोलकर, पोलीस पाटील संजय नाईक, दशावतारातील भीष्माचार्य यशवंत तेंडोलकर, प्रदीप होडावडेकर, अरुण राऊळ, नीलेश सर्वेकर, मंगेश प्रभू, अमर प्रभू आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर रात्री उशीरा वावळेश्वर दशावतार मंडळाच्या ‘अयोध्याधीश श्रीराम’ या ट्रीक्सीनयुक्त नाटकात आयोध्येतील हुबेहूब प्रत्यक्ष देखावे दाखविण्यात आले होते. नाटकातील दशावतार कलाकार विघ्नराजेंद्र उर्फ बच्च कोंडूरकर यांनी हुबेहूब साकारलेल्या रामाच्या भूमिकेला नाट्यरसिकांची मने जिंकली.
16 रोजी सकाळी 10 वाजता प्रश्नमंजुषा (चौथी ते दहावी), सायंकाळी 6 वाजता तेंडोली गावातील नवोदित कलाकारांचा सुरमयी शाम-कराओके शो, 7 वाजता पारितोषिक वितरण व ऋणनिर्देशन, रात्री 9 वाजता साई जळवी फिल्म्स आणि सई एंटरटेनमेंट प्रस्तुत आर्केस्टा जल्लोष मनोरंजनाचा महाराष्ट्र आणि गोवा मधील सुप्रसिद्ध लोकप्रिय गायक, वादक, कलाकारांसोबत अफलातून नृत्यांगनांचा कलाविष्कार होणार आहे.