*कोंकण एक्सप्रेस*
*हळवल फाट्यावरील होणा-या अपघातप्रश्नी सोमवारी बैठक*
*पोलीस उपविभागीय अधिका-यांचे आश्वासन*
*कणकवली : प्रतिनिधी*
मुंबई गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने जाणा-या सिलिका वाळूच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील सोनाली जाधव (वय 27), दक्ष जाधव (वय 12) हे दोघे गंभीर जखमी झाले, त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने हळवल फाटा येथे महामार्ग रोखून धरला होता. वारंवार अपघात होऊन देखील गांभीर्याने उपाययोजना होत नसल्याने अपघात होत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला.
हायमास्ट, महामार्गावर हळवल फाट्यापर्यंत दुतर्फा लाईट तसेच रमलर व आवश्यकतेनुसार स्पीडब्रेकर बाबत जोपर्यंत ठोस आश्वासन दिल्याशिवाय इथून हालणार नसल्याचा इशारा माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह जमावांनी दिला. त्यावेळी याप्रश्नीं तहसीलदार कार्यालयात महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी बैठक घेतली जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी दिले. त्यानंतर दीड तासाने रात्रौ 10 वाजण्याच्या सुमारास आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान जखमी मायलेकाच्या प्रकृती गंभीर असल्याने गोवा मेडीकल कॉलेज येथे हलविण्यात आले आहे.
महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लागल्या रांगा -हळवल फाटा येथे ट्रकने दुचाकीला ठोकरल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला, यावेळी आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक, माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, वागदे सरपंच संदीप
सावंत, राष्ट्रवादीचे विलास गावकर, स्वप्नील चिंदरकर, महेश देसाई, बबूल सावंत, प्रज्वल वर्दम यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. ज्याप्रमाणे राजापूर येथे हायवेवर स्पीड ब्रेकर घातलेले आहेत त्याप्रमाणे स्पीड ब्रेकर घाला किंवा अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा अशी मागणी करण्यात आली. तसेच ज्या सिलिका वाळूची वाहतूक केली जात होती त्या संबंधित व्यवसायिकाशी संपर्क साधत या दुचाकी वरील महिला व मुलगा यांच्या अपघातास कारणीभूत ठरल्याने खाजगी दवाखान्यात होणारा खर्च देण्याची मागणी करण्यात आली. तब्बल दीड तासाने महामार्ग खुला करण्यात आला.तोपर्यंत महामार्गावर वाहनांच्या वागदे व जानवली पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दुचाकीचा झाला चेंदामेंदा -हळवल येथील सोनाली जाधव आणि दक्ष जाधव हे मायलेक दुचाकीवरून कणकवली येथून हळवल येथील आपल्या घरी जात होती. सर्व्हिस रोडवरून हे दोघे वैभव नाईक यांच्या घरासमोरील उड्डाणपुलाला ज्या ठिकाणी सर्व्हिस रस्ता मिळतो, तेथे आले असता उड्डाणपुलावरून वाळू घेऊन भरधाव वेगाने जाणा-या ट्रकच्या (के ए २२ सी ०८८२) पुढच्या चाकात या जाधव माय-लेकाची दुचाकी अडकली. या ट्रकने सुमारे १०० मीटर फरफरट नेत दुस-या टोकाला ट्रक थांबविला. ट्रकच्या पुढील चाकात दुचाकी अडकून पडली होती. दुचाकीचा चेंदामेंदा झाला. अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या माय-लेकाला उपजिल्हा रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री जखमी दोघांनाही गोवा बांबळी येथे हलविण्यात आले आहे. त्या दोघांच्या प्रकृती गंभीर असल्याने सोनाली जाधव हिची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजते.
मुंबई गोवा महामार्ग रोखल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ, उपनिरीक्षक महेश शेडगे, राजकुमार मुंढे, किरण मेथे, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, श्रीमती मांजरेकर आदींसह पोलीस दाखल झाले होते. त्यानंतर श्री. आढाव यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याशीही मोबाईलवर चर्चा झाली. सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल. तसेच दोन्ही बाजूला गतिरोधक व हळवल फाटा येथे हायमास्ट बसविण्याची कार्यवाही लवकर करण्यात येईल, असे आश्वासन श्री. आढाव यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.