*कोंकण एक्सप्रेस*
*सागरी जलधी झोनमुळे रत्नागिरी जिल्ह्याला सापत्न वागणूक*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
ड्रोनचा कॅमेरा १० ते ३० वावापर्यंतच्या अंतरात मासेमारी करणाऱ्या नौका टिपत आहे. अशा नौकामालकांवर दंडात्मक कारवाई होते. मासेमारीसाठी सागरी जलधीक्षेत्राचे झोन तयार केले आहेत. त्या झोनमुळे रायगड जिल्ह्याला सवलत दिली गेली असून, रत्नागिरीतील मच्छीमारांवर मात्र अन्यायच होत आहे. मत्स्यविभाग आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप येथील मच्छीमारांनी केला आहे. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून सहकार्य करावे, अशी विनंती नौकामालकांकडून होऊ लागली आहे.
अवैध मासेमारीवर लक्ष ठेवण्यासाठी मिरकरवाडा तसेच साखरीनाटे आणि दाभोळ येथे ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. पालशेतपासून बोऱ्यापर्यंतच्या समुद्रात ५ वावापर्यंत समुद्रात मासेमारी करण्याची कायदेशीर मुभा आहे; मात्र रत्नागिरीत १० वाव अंतराच्या समुद्रात मासेमारी करणे बेकायदेशीर आहे. जिल्ह्यात सागरी मासेमारी करणाऱ्या ३ हजार १७४ नौका आहेत. त्यातील २ हजार ५१५ यांत्रिकी नौका आहत.
या नौकांच्या मासेमारीवर शासनाकडून वेगवेगळ्या निर्बंधांसह ड्रोनमुळे मत्स्य व्यवसाय विभागाकडून होणाऱ्या कारवाया वाढलेल्या आहेत. त्यामुळे अनेक मच्छीमारांना मनमानी करता येत नाही. मत्स्यविभागानेही सागरी जलधीक्षेत्राचे झोन तयारकेले आहेत. रत्नागिरी जिल्हा हा चौथ्या झोनमध्ये आहे. त्या झोनमध्ये मोठ्या प्रमाणात समुद्र खोली आहे. त्यामुळे १० वावापर्यंत मासेमारी करण्यास बंदी आहे. रायगड जिल्हा तिसऱ्या झोनमध्ये आहे. त्यांची समुद्र खोली कमी असल्याने त्यांना किनाऱ्यावर अगदी पाच ते दहा वावामध्ये मासेमारी करण्यास परवानगी आहे, असे मत्स्यविभागाने सांगितले.