*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपच्या विकास प्रवासात सहप्रवासी होण्यासाठी अनेकजण इच्छुक -रवींद्र चव्हाण*
*ओरोस येथे भाजप कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा संपन्न*
*ओरोस : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आजच्या प्रवेशाने तो अजून मजबूत झाला आहे. यापुढे तुम्हाला आम्हाला सर्वांना हातात हात घालून एकत्रपणे काम करण्याची गरज आहे. फक्त हे करत असताना सिंधुर्गातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करायचे आहे. विरोधी पक्ष अथवा कोणत्याही पक्षाशी जोडले न गेलेले कार्यकर्ते असो, सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भाजप पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्यांना देश, राज्य विकासात सहप्रवाशी व्हायचे आहे, असे प्रतिपादन ओरोस येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलताना केले.
कुडाळ तालुका भाजप पक्षाचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी सायंकाळी ओरोस सावंतवाडा येथील भवानी मंदिर नजीकच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, ऐंड अजित गोगटे, अशोक सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, महेश सारंग, संध्या तेरसे, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला अध्यक्षा आरती पाटील, ओरोस मंडळ अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, रुपेश कानडे, पप्या टवटे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री राणे यांनी, मी दहा वर्षे विरोधी पक्षाचा आमदार राहिलो आहे. त्यामुळे विरोधी आमदाराला निधी देण्यात तसेच पोलीस कारवाई करण्यात कसा पक्षपात केला जातो, याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे यापुढे महायुती सोडून महविकास आघाडीच्या कोणालाही एकही रुपयांचा निधी दिला जाणार नाही. निधी हवा असल्यास भाजप पक्षात प्रवेश करा. आपल्यातील कोणीही त्यांच्यासाठी फोनाफोनी करू नये, असे सांगतानाच पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करीत भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. परिवार म्हणून यापुढे आपण सर्वांनी काम करून यापुढे जिल्ह्यात फक्त महायुती दिसली पाहिजे, असे आवाहन केले. तसेच यापुढे जिल्ह्यात भाजप म्हणून स्वतंत्र निवडणूक लढवूया. निवडून आल्यावर महायुती म्हणून काम करूया. त्यासाठी वरिष्ठांची मानसिकता तयार करा, असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष म्हणून आ चव्हाण यांना केले.