*कोंकण एक्सप्रेस*
*भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट २०२५ च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार*
*मुंबई : प्रतिनिधी*
भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघाने २०२५ च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कु. सानिका विनोद चाळके (फलंदाज आणि उपकर्णधार), कुमारी. भाविका मनोजकुमार अहिरे (फलंदाज आणि विकेटकिपर) आणि कुमारी. ईश्वरी मोरेश्वर अवसरे (ऑलराउंडर) यांनी आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाला यश मिळवून दिले. या खेळाडूंच्या अतुलनीय योगदानाबद्दल आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रसाद लाड तसेच खेळाडूंचे पालकही या सोहळ्यास उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्याशी संवाद साधला. सानिका, भाविका आणि ईश्वरी यांनी केलेली कामगिरी ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. महिला क्रिकेटला उज्ज्वल भवितव्य आहे, आणि या मुलींनी त्याची सुरुवात भक्कम पायावर केली आहे. महाराष्ट्र सरकार त्यांना भविष्यात आवश्यक सर्व सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण असून, विशेषतः महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.