पाडलोस केणीवाडा येथील काजू बागेला आग : लाखो रुपयांचे नुकसान

पाडलोस केणीवाडा येथील काजू बागेला आग : लाखो रुपयांचे नुकसान

*कोंकण एक्सप्रेस*

*पाडलोस केणीवाडा येथील काजू बागेला आग : लाखो रुपयांचे नुकसान* 

*तीन एकरावरील जंगली झाडे जळाली*

*बांदा : प्रतिनिधी*

पाडलोस केणीवाडा येथे रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पाच एकर क्षेत्रावर आग लागली. दोन एकरमध्ये काजू बागायती तर अन्य तीन एकरात जंगली झाडे जळाली.यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

पाडलोस केणीवाडा येथे डोंगराच्या दिशेने आगीच्या धुराचे लोट दिसून आले. आग कुठे लागली ते शेतकऱ्यांच्या लक्षात येईना. मात्र, ग्रामस्थांनी तत्काळ आंबा व काजू बागायतीच्या दिशेने धाव घेतली. काजूची जास्त कलमे जळाली होती तर आग आंबा बागेच्या जवळच आली होती. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याचा तसेच झाडांच्या पाल्याचा वापर केला.परंतु ग्रामस्थांचे प्रयत्न तोकडे पडले.

आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली अन सर्वच ग्रामस्थांनी धाव घेत शर्तीचे प्रयत्न केले व आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत शेतकरी अजित कोरगावकर, प्रसाद कामत, अमित जाधव यांचे मोठे नुकसान झाले.

अचानक दुपारी लागलेली आग आंबा बागायती जवळ पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. सर्व ग्रामस्थांच्या धावपळीमुळेच आणि जिवाची पर्वा न करता दाखविलेल्या धाडसामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले. असे सांगत सर्व ग्रामस्थांचे आपल्यावर उपकार असल्याचे आंबा बागायतदार मनीषा जाधव यांनी सांगितले.

पुष्पगुच्छ किंवा अन्य सुशोभीकरणासाठी जंगलातील भेलडामाडची पाने परप्रांतीयांकडून तोडली जातात. रविवारी दुपारच्या सुमारास दोघेजण याच परिसरातून जंगलातून भेलडामाडची पाने तोडून नेली. त्यावेळी त्यांनीच विडी पेटवून टाकल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. तसेच वनविभागाने जंगलामधील भेलडामाडची पाने तोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!