*कोंकण एक्सप्रेस*
*कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन*
*सिंधुदुर्गनगरी : जिमाका*
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते दि. १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते दि. १७ मार्च २०२५ या कालावधीत सुरु होत आहेत. इ. १० वी च्या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४१ परिक्षा केंद्र आहेत. आणि इ. १२ वी च्या परिक्षेसाठी २३ परीक्षा केद्र आहेत. इ. १० वी च्या परीक्षेसाठी एकूण ९ हजार ६ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत व इ. १२ वी च्या परीक्षेसाठी एकूण ८ हजार ४८७ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.
यावर्षी होणाऱ्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन शासनाचे मुख्य सचिव यांनी केले, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी दिली आहे.
इ.१२ वी व इ.१० वी ची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीतपणे पार पाडावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यकमांतर्गत, शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इ. १२ वी व इ. १० वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीव्दारे (v.c.) बैठक घेण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्या अगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची Facial Recognition System व्दारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येईल. उपरोक्तप्रमाणे सर्व उपाययोजना करण्यात येणार असून याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटक यांनी नोंद घ्यावी.