*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ येथे ११ फेब्रुवारी पासून पर्यावरण महोत्सव*
*कुडाळ : प्रतिनिधी*
शहरातील नागरिकांना पर्यावरणविषयक विविध बाबीविषयी माहिती व प्रदर्शन पाहण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान-५’ अंतर्गत कुडाळ नगर पंचायतीतर्फे ११ व १२ फेब्रुवारी रोजी पर्यावरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
कुडाळ न. पं. कार्यालयानजीकच्या पटांगणात रोज सकाळी ९ ते दुपारी १२ तसेच दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हा महोत्सव सुरू राहणार आहे. नागरिकांनी त्याला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच ई-वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील ई-वाहनांचे अधिकृत विक्रेते यांच्यामार्फत ई वाहनांचे प्रदर्शन, शहरात जास्तीत-जास्त सोलर लाईट्सचा वापरवाढविण्यासाठी, इलेक्ट्रिक बिल कमी करण्यासाठी पंतप्रधान सूर्यधर योजनेंतर्गत सोलर रुफ टोप योजनेबद्दल माहिती व प्रदर्शन, सोलर बसविण्याचे फायदे, सबसिडी आदींबद्दल माहिती महाराष्ट्र विद्युत वितरण तसेच कुडाळ शहरातील विविध संस्था आणि अधिकृत वितरक यांच्याद्वारे देण्यात येणार आहे. शहरात जास्तीत-जास्त प्रमाणात शेवगा व बांबू रोपांचे रोपण करणे तसेच या झाडांचे फायदे याशिवाय अन्य माहिती देण्यात येणार आहे. शहरात वन विभागामार्फत सीडबॉल्स तयार करून दाखविण्याबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम कुडाळ शहरातील नागरिकांसाठी असून लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ न. पं.तर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती न. पं. मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.