कवयित्री सरिता पवार यांच्या “राखायला हवी निजखूण” काव्यसंग्रहास विशाखा काव्यसंग्रह प्रथम पुरस्कार जाहीर

कवयित्री सरिता पवार यांच्या “राखायला हवी निजखूण” काव्यसंग्रहास विशाखा काव्यसंग्रह प्रथम पुरस्कार जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*कवयित्री सरिता पवार यांच्या “राखायला हवी निजखूण” काव्यसंग्रहास विशाखा काव्यसंग्रह प्रथम पुरस्कार जाहीर*

*कणकवली : प्रतिनिधी*

सिंधुदुर्गातील कवयित्री सरिता सदाशिव पवार यांना मराठी साहित्य जगतातील अत्यंत मानाचा समजला जाणारा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला सन २०२२ साल साठीचा प्रथम क्रमांकाचा विशाखा काव्य पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे. तान्हाजी बोऱ्हाडे ( कानसे, आंबेगाव पुणे ) यांच्या जळताना भुई पायतळी या काव्यसंग्रहास सन 2023 साल साठी चा विशाखा काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत समित्यांनी ही द्विस्तरीय निवडप्रक्रिया केली. विद्यापीठाच्या कुसमाग्रज अध्यासनातर्फे दर वर्षी नवोदित कर्वीच्या प्रथम प्रकाशित काव्यसंग्रहाला कवी कुसुमाग्रज यांच्या ‘विशाखा’ काव्यसंग्रह नावावरून ‘विशाखा काव्य पुरस्कार’ दिला जातो. २०२२ च्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी एकूण २१ काव्यसंग्रह, विद्यापीठास प्राप्त झाले होते. त्यातून प्राथमिक छाननी समित्यांनी २०२२ व २०२३ साठी प्रत्येकी सात संग्रह निवडून दिले होते. अंतिम निवड समितीने या संग्रहांमधून २०२२ साठी सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’, प्रवीण अक्कानवरू (बोथी, ता. चाकूर, जि. लातूर) यांच्या ‘औटघटकेची युगांतरं व अमोल देशमुख (महेंद्रनगर, परभणी) यांच्या ‘आठ फोडा अन् बाहेर फेका’ या काव्यसंग्रहांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड केली. २०२३ साठी अंतिम निवड समितीला द्वितीय व तृतीय पुरस्कारसाठी योग्य काव्यसंग्रह न वाटल्यामुळे फक्त प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘जळताना भुई पायतळी’ या तान्हाजी बोऱ्हाडे (कानसे, आंबेगाव, पुणे) यांच्या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला.

पुरस्कारार्थांचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी अभिनंदन केले. निवडप्रक्रियेचे समन्वयक म्हणून कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी काम पहिले. विद्यापीठातर्फे लवकरच पुरस्कारांचे वितरण विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर केले जाणार आहे, अशी माहिती कुलसचिव दिलीप भरड यांनी दिली आहे.

२०२२ चे अंतिम निवड समिती सदस्य म्हणून पी. विठ्ठल (नांदेड), सिसिलिया कार्व्हलोओ (वसई), एकनाथ पगार (देवळा, नाशिक) यांनी काम पाहिले. २०२३ साठी नीरजा (मुंबई), आशुतोष पाटील (जळगाव) व श्रीधर नांदेडकर (छत्रपती संभाजीनगर) यांनी काम पाहिले. २०२२ च्या प्राथमिक निवड समितीत रवींद्र मालुंजकर, प्रशांत भरवीरकर, काशीनाथ वेलदोडे व विवेक उगलमुगले यांचा तर २०२३ च्या प्राथमिक निवड समितीत प्रकाश होळकर, लक्ष्मण महाडिक, राजेंद्र उगले, विजयकुमार मिठे, प्रशांत केंदळे व दत्ता पाटील यांचा समावेश होता. विशाखा काव्य पुरस्कार हा मराठी साहित्यविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. गोविंद काजरेकर, प्रा. वीरधवल परब, प्रा. मोहन कुंभार, अरुण नाईक यांना यापूर्वी विशाखा काव्य पुरस्कार मिळाला आहे. सरिता पवार यांचे विशाखा काव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!