*कोंकण एक्सप्रेस*
*सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची प्रतिक्षा कधी संपणार ?*
*देय रकमांच्या व्याजासह अन्य १२ प्रश्न अद्याप प्रलंबितच ?*
*आम्हाला वाली कोण ?*
*कणकवली : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभापैकी अनेक रकमा दीर्घकाळ प्रलंबित आहेत. शासन निर्णयानुसार कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या देय रकमा विलंबाने दिल्या गेल्यास त्या व्याजासह आदा कराव्यात. अशी तरतूद आहे. म्हणून प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे आपल्या देय रकमा व्याजासह मिळाव्यात असे सुमारे ४५ अर्ज दि. ०३/०१/२०२५ रोजी दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार माहे जुलै २०२४ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षकांच्या उपदान व अंशराशीकरणाच्या रकमा गेल्या आठवड्याभरात जमा करण्यात आल्या आहेत. परंतु भविष्य निर्वाह निधीची रक्कम जी संबंधीत कर्मचाऱ्याच्या नियमित वेतनातून वसूल करण्यात आलेली असते आणि ती शासन नियम व निर्णयानुसार सेवानिवृत्ती दिनांकाच्या दुसऱ्या दिवशी आदा करणे अनिवार्य असते. तसेच ही रक्कम जिल्ह्याकडेच असूनही त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान वगैरे येणे हा प्रकार नसताना ती रक्कम मात्र ६-६ महिन्यांचा कालावधी उलटला तरी का देण्यात येत नाही ते समजत नाही.
तसेच सेवानिवृत्त होऊन अडीच अडीच वर्षाचा कालावधी उलटला तरी गटविम्याच्या रकमा का देण्यात येत नाहीत. या रकमा एवढ्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यामागे कोण कारणीभूत आहे. यासाठी जे कर्मचारी अथवा अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई का होत नाही. हा सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रश्न पडलेला आहे. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी या गोष्टीकडे कधी लक्ष देणार.
पदवीधर श्रेणीधारक शिक्षक, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना दिनांक २१/०६/२०२२ च्या आदेशाने निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. ही एकूण शिक्षक संख्या ८४ होती. आता अडीच वर्षाचा कालावधी उलटला तरी त्यापैकी ०४ शिक्षकांचे निवडश्रेणी सुधारित निवृत्ती वेतन आदेश अद्यापही मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यापैकी मयत असणाऱ्या शिक्षकांकडून अतिप्रदान रक्कमही वसूल करण्यात आली. परंतु अंतिम आदेशाचा मात्र अद्यापही पत्ता नाही.
उर्वरित ८० सुधारित निवृत्ती वेतन आदेश प्राप्त झालेल्या शिक्षकांना त्यांच्या निवृत्ती कालावधीच्या फरकाच्या रकमा आदा करण्यात आल्या परंतु कार्यरत कालावधीच्या फरकाच्या रकमा अद्यापही देण्यात आलेल्या नाहीत. दि. २७/११/२०२४ रोजी शिक्षण लेखा विभागाकडे याबाबत चौकशी केली असता तुमच्या रकमा ऑफलाईन आदा करावयाच्या असल्याने त्याबाबतची कोणत्याही विकास गटाकडून मागणी आलेली नाही असे सांगण्यात आले. परंतु माहे फेब्रुवारी २०२४ पासून आपल्या कार्यालयाकडे तालुक्यांकडून मागणी आलेल्याचे कागदपत्र निदर्शनास आणून दिल्यावर ते कदाचित एका कर्मचाऱ्याच्या टपालात असणार असे सांगण्यात आले. याचाच अर्थ त्या टपालातील मागणी चौकशी करेपर्यंत बघण्यात आलेली नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी लेखाधिकारी शिक्षण यांनी सर्व तालुक्यांकडून आजचे आज ऑनलाईन मागणी घेतो आणि येत्या १५ तारीखला पुणे येथे जावयाचे असल्यामुळे सदरच्या अनुदानाची मागणी संचालक कार्यालयाकडे करतो असे सांगण्यात आले. मात्र पुढे काय झाले ते समजलेले नाही. ही देयक मार्च २०२५ पर्यंत तरी मिळतील अशी अपेक्षा आहे.
जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना त्यांना देय असणाऱ्या रकमा जिल्हा प्रशासनाकडून अतिविलंबाने आदा करण्यात येत असल्याने त्याबाबत अनेकदा आंदोलने करून ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. या शिवाय या प्रशासनाकडे निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे आणखी किमान अति महत्त्वाचे १२ प्रश्न व त्यावरील कार्यवाही प्रलंबित आहे. यासाठी निवृत्त शिक्षकांनी किती काळ प्रतिक्षा करावी असा प्रश्न पडला आहे. अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, सोनू नाईक व रमेश आर्डेकर यांनी दिलेल्या पत्रकात दिली आहे.