*कोकण Express*
*बांद्यात बेकायदेशीर गुटखा जप्त; बांदा पोलीसांची इन्सुली चेक नाका येथे कारवाई!*
*बांदा ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा महार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणा-या कँटरवर गुटख्याची बेकायदा वाहतुक केल्या प्रकरणी आयशर कँटर ताब्यात घेत बांदा पोलिसांनी कारवाई करत तब्बल ६ लाख २४ हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह एकूण २१ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जपल्या केला. सदरील वाहतुक करीत असलेला कँटर चालक लक्ष्मण दिवाणजी भोरडे (२८, रा. वरवे, ता. भोर, जि. पुणे) व क्लिनर सुधाकर कल्याण पानसरे (३२, रा. शेवरी, ता. भोर, जि. पुणे) यांच्यावर बांदा पोलीसात गून्हा दाखल करत चालकासह ,क्लीनर ला अटक करण्यात आले. सदर कारवाई इन्सुली पोलीस तपासणी नाक्या येथे आज दुपारी करण्यात आली.
सविस्तर वुत्त असे की, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कँटर (एमएच १२ एसएक्स २३८८) तपासणी साठी बांदा चेक नाका येथे थांबविण्यात आला. यावेळी तपासणी साठी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी धनंजय गोळे, उदय कामत, संजय हुंबे, रोहित कांबळे यांनी कँटरच्या पाठीमागील हौद्याची तपासणी केली. त्यावेळी कँटर चालकाने हौद्यात औषधे असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आल्याने हौद्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी हौद्यात कापडी गोणी मोठ्या संख्येने दृष्टीस पडल्या. पोलिसांनी याची कल्पना बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी येत कारवाई करण्याचे आदेश दिले.
या गोण्यांची तपासणी केली असता आतमध्ये विमल कंपनीच्या गुटख्याची असंख्य पाकिटे आढळली. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री व बेकायदा वाहतुकीला बंदी असल्याने पोलिसांनी २४ गोण्यांमधील गुटखा जप्त केला. या गोण्यामध्ये असंख्य पाकिटे होती. पोलिसांनी ६ लाख २४ रुपये किमतीचा गुटखा व १५ लाख रुपये किमतीचा कँटर असा एकूण २१ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अन्न सुरक्षा विभागाचे सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली आहे.