*कोंकण एक्सप्रेस*
*बहुचर्चित राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम वेगाने सुरू*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ६० फूट उंच पूर्णाकृती मूर्ती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.या प्रकल्पासाठी तब्बल २४ कोटी ७२ लाख रुपये (जीएसटीसह) खर्च अपेक्षित आहे. मूर्तीची स्थापना १० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुतळ्याचे डिझाइन प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्सद्वारे करण्यात आले आहे.मूर्ती कांस्य धातूपासून तयार होणार असून,तिचा आधारसंरचना संपूर्ण स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात येत आहे.
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तलवारधारी असून ती कमीत कमी १०० वर्षे टिकेल,अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. मूर्तीच्या तळाचा आरसीसी प्लॅटफॉर्म ३ मीटर उंच असून,त्यासाठी गंज-प्रतिरोधक स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येत आहे.पुतळा स्थापनेनंतर पुढील दहा वर्षे तिच्या देखभालीसाठी ठेकेदार नेमण्यात आला आहे.पुतळ्याचे थर्माकोल मॉडेल तयार झाले असून, सध्या कांस्याचे काम २० फूटपर्यंत पूर्ण झाले आहे.४ डिसेंबर २०२३ रोजी अनावरण करण्यात आलेला पुतळा आठ महिन्यात म्हणजेच २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले.पुतळा निर्मिती सल्लागार आणि मूर्तिकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
२६ ऑगस्ट २०२४ रोजी दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन मूर्ती उभारण्याचा निर्णय घेतला. २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली.मालवण राजकोट किल्ल्यावर सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
त्यांच्या माहितीनुसार, मूर्तीचा आरसीसी चबुतरा पूर्णपणे नवीन तयार केला जात आहे. ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प १० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. मूर्तीचे बांधकाम राम सुतार आर्ट क्रिएशन्सच्या वर्कशॉपमध्ये सुरू असून, प्लॅटफॉर्मसाठी आरसीसी आणि स्टेनलेस स्टील यांचा वापर होत आहे.