*कोंकण एक्सप्रेस*
*रिक्षा व्यावसायिक प्रत्येक वेळी मदतीला, हाकेला धावून येतो : सचिन हुंदळेकर*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ रिक्षाचालकांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार*
*कासार्डे : संजय भोसले*
रिक्षा व्यावसायिक हा समाजातील एक महत्त्वाचा घटक समजला जातो. तो प्रत्येक वेळी मदतीला, हाकेला धावून येत असतो. सैफ अली खानला देखील उपचारासाठी पहिला रिक्षाचालकच धावून आला आणि त्यानेच हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. नंतर त्याच्यावरती उपचार सुरू करण्यात आले होते. वेळप्रसंगी रिक्षाचालक पहिल्यांदा धावून येतो व प्रवाशांचे किंवा रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी मदत करतो असे गौरवोद्गार जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले.
जेम्स महाराष्ट्र, सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती, ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ, कणकवली रिक्षा स्टॅन्ड क्रमांक-१, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जेष्ठ रिक्षा व्यावसायिक व चालकाचा सत्कार कार्यक्रम वागदे येथील गोपूरी आश्रमाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री.हुंदळेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोटर वाहन निरीक्षक सचिन पोलादे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेम्स महाराष्ट्र झोनचे अध्यक्ष संजय पन्हाळकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष तथा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, जेम्स कम्युनिटी केअरचे अमित पोवार, ह्यूमन राईट असोसिएशन प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी उपस्थित होते.रिक्षा व्यवसाय करते वेळी गाडीची सर्व कागदपत्रे मुदतीत नूतनी करून ठेवावीत तसेच रिक्षा व्यावसायिकांनी प्रवाशांची सौजन्याने वागावे. व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन सचिन पोलादे यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे म्हणाले. रिक्षाचालकांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केल्याबद्दल सर्व रिक्षा चालक यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील २४० रिक्षाचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रिक्षा संघटनेच्या वतीने झालेल्या कामांची माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर यांनी दिली. सौ.अर्पिता मुंबरकर यांनी व्यसनमुक्तीची शपथ सर्व रिक्षा व्यवसायिकांना व उपस्थितांना दिली.तसेच या कार्यक्रमात कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष म्हणून मंगेश सावंत तसेच मालवण तालुका उपाध्यक्ष म्हणून सुनील पाताडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच रिक्षाचालक सचिन तळेकर यांना ग्राहक पंचायतीचा उत्कृष्ट पुरस्कार कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर युवा उद्योजक म्हणून प्रणव बांदिवडेकर (Orbillo Minerals) तसेच स्पेक्टोमार्टचे प्रोप्रायटर मंगेश चव्हाण यांना देण्यात आला.
ह्युमन राईट बद्दल माहिती मोलाचे मार्गदर्शन संतोष नाईक यांनी केले.तसेच जेम्स महाराष्ट्र व सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती या संस्थेबद्दल माहिती जेम्स महाराष्ट्र झोनचे अधीक्षक संजय पन्हाळकर यांनी दिली. शेवटी जेम्स कम्युनिटी वर्कर्स केअरचे अमित पोवार यांनी आभार मानले.