*कोंकण एक्सप्रेस*
*विक्रोळीत अल्पवयीन प्रेमी युगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत संपवले आयुष्य*
*मुंबई : प्रतिनिधी*
एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या दोघांनी धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.ट्रेनखाली आपला जीव देणारं हे प्रेमीयुगुल अल्पवयीन होतं. यापैकी मुलीचं वय हे १५ तर मुलाचं वय १९ वर्ष असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या दोघांनी विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात धावत्या एक्स्प्रेसमोर उडी घेत एकत्र आयुष्य संपवलं. त्यांच्या लग्नाला त्यांच्या घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १५ वर्षांची मुलगी आणि १९ वर्षाच्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना मुंबईत घडली.ही अल्पवयीन मुलगी परप्रांतीय असल्याची माहिती मिळत आहे. तर मुलगा हा महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रांतवाद किंवा जातीवादाचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.हे प्रेमी युगुल भांडुपच्या हनुमानगर येथील राहणारे होते. रविवारी दुपारी अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत घरातून बाहेर पडली. त्यानंतर आजीच्या नकळत ती निघून गेली.मुलगी बेपत्ता झाल्यानंतर भांडुप पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र, काही वेळाने रेल्वे पोलिसांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधला आणि थेट तिच्या मृत्यूची माहिती दिली.
पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. आपला जीव देण्यापूर्वी या प्रेमी युगुलाने कुठली सुसाइड नोट वगैरे लिहिली होती का, कुठला व्हिडिओ वगैरे केला होता का? याचा पोलीस तपास घेत आहे.या घटनेने भांडुपच्या हनुमाननगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.