*कोकण Express*
*सिलिका वाळू उत्खननामुळे पर्यावरणाला धोका*
*अवैध वाळू उत्खनन करणार्या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे*
*मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कासार्डे, लोरे, वाघेरी, पियाळी तसेच वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गावात होत असलेल्या अवैध सिलिका वाळू उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. वनसंज्ञा क्षेत्र असूनही तेथे वाळू उत्खनन होत आहे. त्यामुळे अशा अवैध वाळू उत्खनन करणार्या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज केली.
श्री.उपरकर यांनी आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेऊन अवैध सिलिका वाळू उत्खनन बाबतचे निवेदन दिले. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, संतोष सावंत आदी उपस्थित होते. श्री.उपरकर यांनी सर्वप्रथम अवैध सिलिका उत्खनन करणार्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केल्याबद्दल महसूलचे अभिनंदन केले.
श्री.उपरकर म्हणाले, पर्यावरणाचे सर्व नियम डावलून सिलिका उत्खनन होत आहे. यात उत्खननामध्ये ट्रेडींगच्या नावावरती वाहतूक पास दिले जात आहेत. परंतु हे सर्व पास बोगस आहेत. या पासवरील बारकोड मॅच होत नाहीत. त्यामुळे या प्रकाराचीही संपूर्ण चौकशी व्हायला हवी. बोगस पास तयार करून तसेच अवैध सिलिका उत्खनन करून येथील व्यावसायिकांनी शासनाचे कोट्यवधी रुपये बुडविले आहेत. आम्ही या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्यांचेही लक्ष वेधले होते. मात्र गेले दोन वर्षे या व्यावसायिकांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र आता दंडात्मक कारवाई बरोबरच या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
दरम्यान अनधिकृतपणे उत्खनन झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई जागेवर जाऊन तहसीलदार यांनी मोजमाप घेऊन चार विनापरवाना उत्खनन करणार्या खाणींचे तहसीलदारांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप घेऊन सुमारे ३ कोटी ३९ लाखाचा दंड ठोठावला असल्याची माहिती प्रांताधिकार्यांनी श्री.उपरकर यांना दिली.

