हुंबरठ तिठा ते फोंडा तिठा रस्त्याचे नेमके गौडबंगाल काय ?

हुंबरठ तिठा ते फोंडा तिठा रस्त्याचे नेमके गौडबंगाल काय ?

*कोंकण एक्सप्रेस*

*हुंबरठ तिठा ते फोंडा तिठा रस्त्याचे नेमके गौडबंगाल काय ?*

*फक्त १ की.मी.रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दीड महिन्याहून जास्त विलंब :वाहन धारकांना निष्कारण भुर्दंड*

*वाहनधारक व प्रवाश्यांचे हाल :तात्काळ कारवाईची मागणी*

*कणकवली :प्रतिनिधी*

हुंबरठ तिठा ते फोंडा तिठा यामधील करुळ येथील रस्त्याचे नेमके काय चालले आहे हे समस्त लोकांना समजेनासे झाले आहे. करुळ पिकअप शेड ते कारखान्यासमोरील रस्ता गेला संपूर्ण पावसाळा हा चिखल व खड्डेमय झाला होता.त्याच्या दुरुस्तीचे काम जवळ-जवळ गेला दीड महिना किंवा त्यापेक्षा अधिक दिवस चालू आहे. या संपूर्ण दुरुस्ती रस्त्याची लांबी ०१ कि.मी. सुद्धा होणार नाही. परंतु त्याच्या कामासाठी गेला दीड महिना घालविण्यात आला. त्यावर खडी व डांबर घालण्यासाठी दोन दिवस रस्त्याची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली.त्यामुळे लोकांना व्हाया नांदगाव कणकवली असा प्रवास करणे अपरिहार्य ठरले. फोंडा ते कणकवली १८ कि.मी. अंतर असताना ते २६ ते २८ कि.मी. अंतर प्रवास करणे आवश्यक ठरले.हा वाहन धारकांना निष्कारण भुर्दंड पडला.

त्यानंतर मध्ये दोन दिवस डांबराचे काम पूर्ण बंद करुन पुन्हा थोडा मातीचा रस्ता तसाच ठेवला.खरेतर तो त्याच वेळी पूर्ण करता आला असता परंतु दोन दिवसांनी काल १०० ते १५० मी. कामासाठी पुन्हा वाहतूक बंद करण्यात आली.एवढ्या छोट्याश्या कामासाठी वाहतूक पूर्ण बंद करण्याची काहीही आवश्यकता नव्हती.कारखान्यासमोरील फोंड्याकडील बाजूला जिथे नवीन काम संपते त्याच्या थोडे पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ता उखरुन दोन मोठे खड्डे पडले आहेत. तसेच कानडेवाडीपासून स्वामीसमर्थ मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरुन नेमकी गाडी कोणता खड्डा चुकवून पुढे काढावी तो प्रश्न आहे. त्यामुळे लोकांच्या वाहनाची अकारण वाट लागत आहे. आता हा पुढचा रस्ता दुरुस्त करणार आहेत की नाही आणि करणार असतील तर त्याला किती महिने घालवतील ते सांगता येत नाही. याच गतीने काम करणार असतील तर हा साधारण दोन ते अडीच कि.मी. लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती मे महिन्यापर्यंत तरी पूर्ण होईल का?

एवढी प्रगत यंत्रसामुग्री असताना ह्या रस्त्याची दुरुस्ती अशी रडत रडत का चालली आहे. हा लोकांना प्रश्न पडला आहे त्याचे उत्तर बांधकाम विभागाचे अधिकारी देतील का? लोकांकडून वाहन खरेदी करताना १५-१५ वर्षाचा टॅक्स अगोदरच भरुन घेतात. असे असूनही रस्ते चांगले नसणे किंवा इतक्या विलंबाने दुरुस्ती करणे यासारखे दुर्दैव नाही. येत्या ०८ दिवसांत आवश्यक ती यंत्रसामुग्री व उत्तम दर्जाचे साहित्य वापरुन स्वामी समर्थ मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम बांधकाम विभागाचे अधिकारी तातडीने करुन वाहनधारक व प्रवाश्यांचे हाल थांबवतील अशी अपेक्षा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!