कोंकण एक्सप्रेस
रावराणे मंडळाचे माजी अध्यक्ष रघुनाथ रावराणे यांचे दुःखद निधन
तात्यांच्या जाण्याने रावराणे समाजाच्या इतिहासातील एक उज्वल अध्याय संपला
खोरकर ( अरुळेकर )रावराणे मंडळाचे माजी अध्यक्ष आणि महाराणा प्रतापसिंह संस्थेचे मार्गदर्शक रघुनाथ फतेसिंग रावराणे शिक्षण – एमए,
एलएलबी,गाव- अरुळे यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांनी रिझर्व बँकेत मोठ्या पदावर नोकरी केली.त्यांच्या जाण्यामुळे रावराणे समाजाच्या इतिहासातील एक उज्वल अध्याय संपला आहे.
तात्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका प्रामाणिक आणि सेवाभावी व्यक्तिमत्वाला गमावल्याची शोक भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
तात्या, गेल्याची दुःखद बातमी सायंकाळी कानावर आली आणि धक्का बसला.विश्वास बसणार नाही अशी ती बातमी होती.पण अखेर बातमी सत्य ठरली. अरे, रे,सर्वांचे आवडते तात्या गेले.
अनेकांना त्यांच्या साध्या,धाडसी,हरहुन्नरी,आणि स्पष्टबोलण्याच्या स्वभावाचे कौतुक आणि अप्रूप वाटत होते,सुसंकृत, उच्चशिक्षित,प्रेमळ आणि उघड्या मनाचे ते सभ्य माणूस होते.तात्या हे अचानक दूरच्या प्रवासाला कायमच निघून जाणे म्हणजे माझ्या सारख्या अनेकांना प्रेम देणाऱ्यांना ते कायमचे सोडून जाण्यासारख आहे.ही मनाला लागलेली रुख, रुख या पुढे सर्वांच्या मनाला कायम दुःख देणारी ठरली आहे.
रावराणे इनामदार कुलवृत्तांत लिखाणामुळे तात्यांशी माझा निकटचा संबंध आला.त्यामुळे तात्यांचे गुण वैशिष्ट्य मला भावले.स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून त्यांचे मला अप्रूप वाटायचे.स्पष्ट बोलणे म्हणजे मोकळे, प्रामाणिक आणि संवादात सरळ असणे. जेव्हा एखाद्याचे स्पष्टपणे वर्णन केले जाते,तेव्हा या गुणवत्तेची त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रशंसा होते.ते गुण मला तात्या यांच्यात दिसले.
तात्यांच्या जाण्याने मंडळाचा एक आधारस्तभ उन्मळून पडण्यासारख आहे.समाजात सर्वात पहिले उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून तात्यांकडे पाहिले जात होते.रावराणे मंडळाच्या सर्व घटनांचे साक्षीदार होते. रावराणे मंडळ 1982 साली स्थापन झाले तेव्हा पासून ते कार्यकारी मंडळात होते.समाज मोठा व्हावा मंडळाच्या माध्यमातून समाजाची प्रगती व्हावी ही त्यांची अखेर पर्यंत धडपड होती.आपल्या मुलखावर,शेतीवाडीवर त्यांचे अफाट प्रेम होते.तात्या ज्या दहिसर ठिकाणी राहत होते.तिथे त्यांचा स्वतःचा ऐसपैस बंगला होता.मुबंईत स्वतःचा बंगला असणे ही एक मोठी प्रतिष्ठा आहे.त्या जागेवर आता त्यांनी स्वतःसाठी एक बिल्डिंग उभारली.पण ती स्वतः उभारली.कुठल्या बिल्डरला जागा विकली नाही.हे सुद्धा समाजातील लोकांनी खूप चांगले शिकण्यासारखे आहे.तात्या समाजातील तरुण मुलांना प्रेरणा देऊन गेले.त्यांनी विविध संस्थांवर त्यांनी काम केले आहे आणि आपल्या कामाचा ठसा उमटविला.
कुलवृत्तांत होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
रावराणे समाजाचा कुलवृत्तांत पूर्ण व्हावा हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.पण त्यांना लिखाण करणारा कोणी भेटत नव्हता.म्हणून गेली काही वर्षे ते काम
पूर्ण झालेले नव्हते.त्यांनी मला एकदा फोन केला आणि ज्ञानेश्वर,तू कुलवृत्तांत लिहावा अशी माझी आहे असे ते म्हणाले. ते काम समाजाचे आहे.त्यामुळे कोणताही मागचा पुढला विचार न करता त्यांना मी हो म्हटले. आणि कुलवृत्तांत लिहिण्यास सुरुवात केली.त्यानंतर कुलवृत्तांतच्या लिखाणा साठी आमच्या नेहमी भेटी गाठी आणि बैठका होत असत.कुलवृत्तांताचे काम कुठं पर्यंत आले याचे ते रोज माहिती घेत असत.त्या साठी त्यांनी एक वही ठेवली होती.त्यात ते नोंद करून ठेवत असत.काम करण्याची ती एक चांगली पद्धत होती.कामाचा सतत पाठपूरावा करून ते कसे करून घेयाचे हे तात्याकडे एक मोठं कौशल्य होते.कुलवृत्तांत पूर्ण होण्यास तात्यांचे मोठे योगदान होते.म्हणूनूच ते काम पूर्ण झाले.त्यांना फोन केल्यावर कुलवृत्तांताचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद नेहमी जाणवायचा ! तात्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा हातभार लागला याचे मला समाधान वाटत आहे.

