*कोंकण एक्सप्रेस*
*माणगाव येथील कृष्णा आडेलकर यांचा प्रामाणिकपणा*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
माणगाव येथील रहिवासी कृष्णा प्रकाश आडेलकर यांना सावंतवाडी ते वेंगुर्ले अशा प्रवासादरम्यान मळगाव येथे रियल मी कंपनीचा सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आढळून आला.त्यांनी तो मोबाईल वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे जमा केला.सदर मोबाईलबाबत वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सायबर शाखा येथील प्रथमेश गावडे यांच्या सहकार्याने वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस दिपा मठकर यांनी शोध घेऊन त्या मोबाईलचे मालक रामकृष्ण मोहन धुरी (शेर्ले, ता. सावंतवाडी) यांची माहिती आणि ओळख निष्पन्न करून त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.आजच्या जमान्यात प्रामाणिकपणा कमी झाला असताना कृष्णा आडेलकर यांनी आपण केलेल्या कार्यातून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.आपण समाजाचे काही देणे लागतो,यातून निष्ठेची जपणूक कृष्णा यांनी दाखवून दिली.कृष्णा आडेलकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.