*कोंकण एक्सप्रेस*
*दिविजा वृद्धाश्रमातील आजींनी साजरा केला हळदी कुंकवाचा कार्यक्रम*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दिविजा वृद्धाश्रमात आजीनी पारंपारिक पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. दिविजा वृद्धाश्रमातील आजी सौ रासम यांनी सुगड पूजन केले तर आश्रमातील कर्मचारी अश्विनी,अस्मि,सायली व अमृता यांनी सुगड पूजेसाठी सुबक रांगोळ्या व सजावट केली. या कार्यक्रमा निमित्ताने सर्व आजीं मध्ये उत्साह होता.
आश्रमातील सर्व आजींनी सुगडाची पूजा करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. नाच गाण्याच्या कार्यक्रमात छानसा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व आजोबांना बोलवून त्यांना तिळगुळ घ्या व गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटले. अतिशय आनंदपूर्ण उत्साही वातावरणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. आपण कुटुंबात असताना सर्व सण व उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करतो. तोच उत्साह आणि आनंद वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मिळावा, यासाठी इथल्या व्यवस्थापनाकडून सर्व सण व उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरे केले जातात.