*कोंकण एक्सप्रेस*
*आरटीओ अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा :नितेश राणेंच्या सुचना*
*जिल्हा रस्ता सुरक्षा समिती,सिंधुदुर्ग रस्ता सुरक्षा अभियान २०२५ समारंभ :जिल्हा उपप्रादेशिक परिवहनच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील वाहन अपघात आणि त्यामुळे होणारे निधन याची संख्या वाढतच आहे.त्यामुळे ज्या वर्षी गतवर्षी पेक्षा अपघात आणि त्यामुळे होणारे निधन ही संख्या कमी होईल, त्यावेळी आम्ही राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यशस्वी झालो,असे समजू शकतो. त्यामुळे वाहन चालकांनी नियम कडक पाळावेत तर आरटीओ अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आवाहन राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह शुभारंभ कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी मंत्री राणे यांच्याहस्ते दीप प्रज्वलननाने झाला.यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सार्वजनिक बांधकामे कार्यकारी अभियंता अनिलकुमार सर्वगोड, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे आदी उपस्थित होते.
यावेळी विना अपघात एस टी चालविणारे चालक गणेश वेंगुर्लेकर, धर्माना नडगिरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विना अपघात रिक्षा चालविणाऱ्या चालकांच्यावतीने नारायण राऊळ यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.जीवनदुत म्हणून रस्ते अपघातात मदत करणाऱ्या संजय नकाशे,भालचंद्र टवटे,बाबली राणे, रुपेश बिडये यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बांदा येथील गौरी बांदेकर व त्यांच्या साथीदारांनी नियम तोडून वाहन चालवून रस्ते अपघातात होतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांवर कोसळणारे दुःखाचे डोंगर पथनाट्याद्वारे सादर करून त्यातील भीषणता व्यक्त केली.