*कोंकण एक्सप्रेस*
*पतंजलि योग परिवार सिंधुदुर्गचा “आनंदमेळा 2025” कुडाळ येथे दिमाखात संपन्न*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
भारत स्वाभिमान आणि पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे दि 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता भारत स्वाभिमान दिन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ अर्थात पतंजलि आनंदमेळा 2025 चे उदघाटन करण्यात आले.या महोत्सवाचे उद्घाटन सावंतवाडी माजी नगराध्यक्ष श्री संजू परब तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग चे जिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर,भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी श्री. तुळशीराम रावराणे, कुडाळ शहर माजी उपनगराध्यक्ष श्री मंदार शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते श्री काका कुडाळकर, सौ संजना परब आणि सौ स्नेहांकिता माने आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिप प्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर भारत स्वाभिमान दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रियांका हरमलकर आणि सौ. वर्षाराणी अभ्यंकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ दिपाली गवस यांनी केले.सदर महोत्सवात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील योगाभ्यास प्रेमींनी , नागरिकांनी देवगड, कणकवली, फोंडाघाट, सावंतवाडी, कुडाळ, आणि मालवण तालुक्या आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला.अंदाजे 500 हुन अधिक साधकांनी यात उपस्थिती होती.सिद्धिविनायक हॉल कुडाळ मध्ये सदर महोत्सवासाठी लागणारे सभागृह,स्टेज,साऊंड सिस्टिम, नाष्टा , जेवण आणि जागा हे सर्व उद्घाटक श्री संजु परब यांनी उपलब्ध करून दिले.त्याबद्दल आयोजकांनी श्री संजु परब यांचे शाल आणि श्रीफळ देऊन आभार मानले.
योग ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने या योग वर्गाचा लाभ घेऊन जास्तीत जास्त योगशिक्षक सिंधुदुर्ग मध्ये व्हावेत अशी आशा यावेळी त्यांनी व्यासपीठावरून व्यक्त केली.तसेच सर्व मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत सदर कार्यक्रम नीटनेटका स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.एकूणच कार्यक्रमाचे स्वरूप भव्य दिव्य होतं.योग आणि सूक्ष्म व्यायाम या थीमवर सांस्कृतिक कार्यक्रमांची बांधणी करण्यात आली होती.
यात सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला.याच्या दुसऱ्या सत्रात “देहदान” या विषयावर श्री प्रमोद लिमये कणकवली,यांनी उत्तम मार्गदर्शन केलंशेवटच्या सत्रात नियमित योग कक्षेत येणाऱ्या व आपला उत्तम सहभाग नोंदविणाऱ्या सर्व साधकांच कौतुक करीत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आल.एकूणच दिवसभर चाललेल्या या “आनंद मेळा 2025” चा सर्वांनी भरभरून आनंद लुटला.पतंजली सिंधुदुर्गचे असेच विविध उपक्रम पुढेही होत राहतील.
अशी ग्वाही कार्यक्रमाध्यक्ष श्री.बांदेकर यांनी दिली.