*कोंकण एक्सप्रेस*
*एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने गतवर्षाला निरोप*
*श्रावणी कॉम्प्युटर, तळेरे पत्रकार मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
वर्षाच्या अखेरीस ३१ डिसेंबर रोजी दरवर्षी सर्वत्र वेगवेगळे उपक्रम संपन्न होत असतात. मावळते वर्ष आणि उगवते वर्ष यांची संधी साधून निरोप आणि स्वागताच्या निमित्ताने तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर व तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षाच्या अखेरीस आगळावेगळा असा स्वच्छता मोहिमेचा व पर्यावरण सुरक्षेचा औचित्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
३१ डिसेंबर २०२४ रोजीच्या इसवी सन वर्षाला निरोप देताना श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या विद्यार्थ्यांनी आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराने देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथील मराठी वृत्तपत्रकारितेचे जनक, पहिल्या वहिल्या दर्पण या मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाची व स्मारका सभोवतीच्या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली. दरम्यान तेथील निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक वनभोजनाचा आस्वाद घेऊन विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रोशनी बागवे, स्मितेश पाष्टे, सोहम सावंत, स्नेहल तळेकर,रणजीत गुंडिये, साहिल पवार, सोहम मेस्त्री, विक्रांत सावंत, श्रेयस तावडे, दीक्षा धावडे, साक्षी नेवरेकर, कोमल कांजीर, रंजना पेडणेकर, साहिल वंजारे, विराज शेट्ये, अनंत येरम, विराज लाड, सानिका पटकारे, प्रफुल्ल घाडी, मनीषा परब, प्रतीक भालेकर, प्रितेश दुदवडकर, विराज खांडेकर या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेतला.
गेली ८ वर्षे सातत्याने तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटर्स एज्युकेशन सेंटरचे संचालक सतीश मदभावे व सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीच्या अध्यक्षा सौ.श्रावणी मदभावे यांनी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवून दिंडी पुढे नेली. व्यसनापासून अलिप्त राहून सामाजिक बांधिलकी मनात मानत पर्यावरण संतुलनाच्या कामी वर्षाखेरीचा दिवस सार्थकी लावण्याचा पण करीत आठ वर्षे असंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग दिलेला आहे. या आदर्श उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
याप्रसंगी तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे संचालक सतीश मदभावे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुदवडकर, उपाध्यक्ष गुरुप्रसाद सावंत माजी अध्यक्ष दत्तात्रय मारकड, विद्यमान खजिनदार निकेत पावसकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे सदस्य तसेच कासार्डे हायस्कूलचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, दळवी कॉलेजचे मास मीडिया विभाग प्रमुख प्रशांत हटकर, योगा शिक्षक संजय भोसले तसेच दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पाचवे वंशज सुधाकर जांभेकर, कासार्डे हायस्कूल पर्यवेक्षक शामसुंदर राणे, सी. आर. पी. प्रेरणा तळेकर, भाग्यश्री हटकर. अनंत कोकरे, राजेश भोगले, कल्पेश तळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

