*कोकण Express*
*सिलिका वाळूच्या अनधिकृत वाहतूकप्रकरणी ५ लाख ३३ हजाराची दंडात्मक कारवाई*
अनधिकृत सिलिका वाळू वाहतूक करत असल्याप्रकरणी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने केलेल्या कारवाईत चार वाहनांमधून एकूण १० ब्रास सिलिका वाळूची अनधिकृत विनापरवाना वाहतूक करत असल्याप्रकरणी ५ लाख ३३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तहसीलदार आर. जे. पवार यांनी ही कारवाई केली. कणकवली प्रांताधिकाऱ्यांसह महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी कासार्डे येथे वाळू वाहतूक करणारी ही चार वाहने पकडली होती. यात दोन ट्रक व दोन डंपरचा समावेश होता. त्यानंतर ती वाहने ताब्यात घेत कणकवली तहसील कार्यालय समोर आणून ठेवण्यात आली. त्याचा पंचनामा करून डंपर व ट्रकमधील वाळूचे मोजमाप करताच तहसीलदार आर. जे. पवार यांनी ही दंडात्मक कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेले डंपर आणि ट्रकमालक व सिलिका वाळू व्यावसायिकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आज गर्दी केली होती.
विनापरवाना वाळू उपसा व वाहतूकप्रकरणी दस्तुरखुद्द प्रांताधिकारी मैदानात उतरल्याने सिलिका वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी केलेल्या कारवाईत प्रांताधिकारी वैशाली राजमाने, महसूल नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड, मंडळ अधिकारी मंगेश यादव, संतोष नागावकर, नांदगाव मंडळ अधिकारी व्ही. ए. जाधव, नांदगाव, तळेरे, फोंडाघाट, लोरे तलाठी, कोतवाल सहभागी झाले होते.