*कोंकण एक्सप्रेस*
*वैज्ञानिक दृष्टिकोनच तुम्हाला आत्मनिर्भय बनवेल – राजेंद्र मगदूम पोलिस निरीक्षक*
*कुडाळ : प्रतिनिधी*
समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी ‘अनिष्ट ‘ अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत.अनेक बळीही गेले आहेत.यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले रहावे आणि जादूटोणा करणाऱ्यांनी भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केल. मात्र लोकांमध्ये हा कायद्याचा प्रसार प्रचार न झाल्याने त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नाही.जर तुम्ही तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केलात तर तुमचं जीवन सुखी समृद्धी होईल आणि तुम्ही आत्मनिर्भय बनाल म्हणून आज जादूटोणा विरोधी कायदा काय आहे तो समजावून घ्या आणि त्याचा स्वतःचे जीवन आणि इतरांचे जीवन समृद्धी करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन कुडाळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक तथा दक्षता अधिकारी मान राजेंद्र मगदूम साहेब यांनी केले.
जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पोलीस ठाणे कुडाळ यांच्या पुढाकाराने कुडाळ तालुक्यातील सर्व पोलिस पाटील यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे मार्गदर्शन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयीचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान मराठा हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ते विचारमंचावरून बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजीव बिले,जिल्हा संघटक विजय चौकेकर, जिल्हा संघटिका रूपाली पाटील,उज्वला येळावीकर,कल्याण कदम आदी उपस्थित होते .
यावेळी जिल्हा अध्यक्ष राजीव बिले यांनी सर्व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करताना आमचा देवधर्माला विरोध नाही मात्र देव धर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्धच लढा असल्याचे सांगितले. आपण सर्वांनी हा कायदा समजून घ्या.इतरांना कायदा समजून सांगा तुमच्या गावागावांमध्ये या कायद्याचं व्याख्यान आयोजित करा असे आवाहन केले.
जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी जादूटोणा विरोधी कायदा कोणत्या परिस्थितीत मंजूर करण्यात आला. तसेच या कायद्यामध्ये कोणती कलमे आहेत ? हा कायदा कोणाला लागू आहे व कोणत्या कृतीसाठी लागू नाही याबाबत संपूर्ण माहिती देऊन एकूण बारा अनुसूचिच्या आधारावर जादूटोणा करणारे आणि भोंदू लोक आपल्यात अलौकिक शक्ती आहे म्हणून सांगून कसे चमत्कार करतात आणि हातचलाखी करतात याची विविध प्रात्यक्षिके संतांच्या दाखल्यासहित करून दाखविली. यामध्ये पाण्याने दिवा पेटविणे, मंत्राने अग्नी पेटविणे,पारा भूत उतरविणे, नारळातून करणी काढणे,मंत्राने अगबत्तीची दिशा बदलणे, हातातून सोन्याची चैन काटणे,जिभेतन तार आरपार काढणे,पेटता कापूर खाऊन दाखविणे, इत्यादी प्रात्यक्षिके सहज करून दाखवली.सदरची प्रात्यक्षिक पोलीस पाटील, तसेच महिला पोलिस पाटीत यांच्याकडूनही करून घेतली.
असेच कार्यक्रम जर गावागावात होत राहिले तर गावांमध्ये जनजागृती होईल आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्यांची दुकाने आपोआप बंद होतील.यासाठी सर्व पोलीस पाटील यांनी गावांमध्ये अशा कोणत्याही घटना घडत असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी आणि आपल्या गावात कोणत्याही प्रकारे कोणाकडूनही जादूटोण्याचे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन विजय चौकेकर यांनी केले.
* हिर्लोक प्रकरणात कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे विशेष अभिनंदन*-
हिर्लोक येथील घडलेला प्रकार आपल्या तालुक्यात पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम साहेब यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान सर्व पोलिस पाटील यांच्यासाठी आयोजित केल्याबद्दल अभाअंनि समिती तर्फे पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी पोलिस हवालदार भूमिका रेडकर. जें टि झारापकर’ संजय कदम तसेच समितीचे युगांत चव्हाण, अभिजित कानशिडे, मारुती सोनवडेकर आदी उपस्थित होते. या व्याख्यानाचा लाभ तालुक्यातील ८९ पोलिस पाटील यांनी घेतला.