*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्र्यांकडून ई-कॅबिनेटचे सूतोवाच !*
*मुंबई : प्रतिनिधी*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत ‘ई-कॅबिनेट’चे सूतोवाच केले.राज्य मंत्रिमंडळाच्या टिप्पणीचा संपूर्ण मसुदा मंत्र्यांनी टॅबच्या माध्यमातून हाताळावा.त्यामुळे कागदाची बचत होऊन पर्यावरण जपले जाईल,ही त्यामागची भावना आहे,असे कारण सांगण्यात येत आहे.मात्र मंत्रिमंडळ टिप्पणी प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागू नये,यासाठी ही योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीच्या आदल्या दिवशी सायंकाळी बैठकीत कोणते प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत, त्याचा तपशील काय आहे, याची गोपनीय टिप्पणी प्रत्येक मंत्र्याकडे पाठविली जाते.
ती त्यांच्या शिपायाकडून खासगी सचिव,स्वीय साहाय्यक किंवा विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांपर्यंत जाते.पण अनेकदा त्याआधी किंवा मंत्रिमंडळ बैठक झाल्यावरही ही टिप्पणी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना उपलब्ध होते.त्यातील अनेक बाबी गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असते.त्यामुळे कागद वाचविण्याच्या नावाखाली केवळ टॅबवरच मंत्रिमंडळ टिप्पणीचा मसुदा पाठविण्याचा प्रस्ताव आहे.पण अनेक मंत्र्यांना टॅब वापरता येत नसल्याने त्यांची पंचाईत होणार आहे.