*कोंकण एक्सप्रेस*
*मडुरा येथील शेतकरी प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषि विभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५.१२.२०२४ रोजी जिल्हाअंतर्गत “काजू मोहोर संरक्षण व भाजीपाला पीक संरक्षण” या विषयावर सावंतवाडी तालुक्यातील मडुरा विकास सोसायटी माऊली शेतकरी सभागृह येथे शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले होते.या प्रशिक्षणासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र,वेंगुर्ला येथील डॉ.गोपाळ गोळवणकर संशोधन सहयोगी हॉर्टसॅप प्रकल्प,श्री. युवराज भुईम्बर मंडळ कृषि अधिकारी बांदा,श्री.अझमुद्दीन सरगुरू, श्रीम.मनाली परब कृषी पर्यवेक्षक,श्रीम.पल्लवी सावंत,श्रीम. श्वेता बेलगुंदकर कृषी सहाय्यक (मडुरा व शेर्ले) व काजू व भाजीपाला उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
श्री. अझमुद्दीन सरगुरू यांनी या प्रशिक्षणाचा उद्देश व महत्व आपल्या प्रस्तावनेतून विशद केला. तांत्रिक सत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी काजू मोहोर संरक्षण व भाजीपाला कीड-रोग व्यवस्थापन, फवारणीचीचे तंत्र, एकात्मिक कीड- रोग व्यवस्थापन या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. श्री. युवराज भुईम्बर यांनी शेतकर्यांना देशी सोबत विदेशी भाजीपाला लागवड, फणस, निरफणस या पिकांची लागवड, त्याचे महत्व याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणादरम्यान शेतकर्यांनी त्यांना काजू व भाजीपाला पिकांमध्ये येणार्या समस्यांविषयी शास्त्रज्ञांशी चर्चा करून त्यावर कशाप्रकारे मात करावी याची माहिती करून घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.पल्लवी सावंत व आभार प्रदर्शन श्रीम.श्वेता बेलगुंदकर यांनी केले.या प्रशिक्षणास शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.