*कोंकण एक्सप्रेस*
*आगामी काळात ठाकरे शिवसेना सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार – पदाधिकाऱ्यांचा विश्वास*
*सत्ता आल्यानंतर भाजपकडून दादागिरी सुरू झाल्याचा आरोप*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
आगामी काळात सिंधुदुर्गात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम ठाकरे शिवसेना काम करणार आहोत. आम्ही लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहोत, अशी भूमिका आज येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान सत्तेत आल्यानंतर भाजपची दादागिरी सुरू झाली आहे. काल कुडाळ येथे झालेल्या प्रकार आणि सासोली येथे झालेल्या जमीन प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांची दादागिरी दिसून आली. त्यामुळे अशा प्रकारच्या विरोधात आम्ही निश्चितच दंड थोपटणार आहोत. तसेच सहा महिन्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भव्य आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज राजन तेली यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, राजन तेली, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, रुपेश राऊळ, मायकल डिसोजा, मंदार शिरसाट, भारती कासार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी श्री. उपरकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला अपयश मिळाले. ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्याचे नेमके कारण काय? याचा शोध घेण्यात येणार आहे. अशा पराभवाने खचून न जाता आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीत यश मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटना बांधण्यासाठी पुन्हा कार्यकर्त्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी असल्या तरी आम्ही सत्ताधाऱ्यांना विरोधासाठी विरोध करणार नाही. त्यांनी चांगले निर्णय घेतल्यास आम्ही निश्चितच त्यांचा सन्मान करू, परंतु सहा महिन्यानंतर त्यांचे कार्य, कामाची पद्धत बघून त्यांच्या विरोधात आंदोलन छेडले
यावेळी वैभव नाईक म्हणाले, या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना बांधणीवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचे काम सुरू आहे. नव्याने कार्यकर्ते जोडले जाणार आहेत. सोबत पराभवाचे आत्मचिंतन केले जाणार आहे. तसेच पक्षाला पुन्हा एकदा उभारी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
यावेळी तेली म्हणाले, तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आजगाव, आरवली परिसरात पुन्हा एकदा मायनिंग सुरू करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यामागे एका बड्या उद्योगपतीचा हात आहे. तर त्याला पाठीशी घालणारी नेमके कोण? हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे येथील जनतेने विरोध करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांच्या ठामपणे पाठीशी राहणार आहोत. त्या ठिकाणी डंपर व्यावसायिकांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे.
यावेळी संदेश पारकर यांनी आपले विचार व्यक्त केले. त्याप्रसंगी शब्बीर मणियार, बाळू माळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.