*कोंकण एक्सप्रेस*
*ओझरम जि.प.च्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*
गावातच शिकून मुंबई येथे उच्च पदावर गेलेल्या व्यक्तींना इथे आणून या मुलांना विविध प्रशिक्षण दिले जाईल. म्हणजे भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे. करिअर म्हणून काय करायचे आहे हे ठरवून तशा प्रकारची मार्गदर्शक आणले जातील, असे प्रतिपादन जीवन प्रबोधिनी ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष, कुनकवण गावचे सुपुत्र सत्यवान नर यांनी ओझरम येथील कार्यक्रमात केले. ते ओझरम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1 च्या निवासी संकुलात असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी निवासी संकुल दक्षता समिती अध्यक्ष लक्ष्मण राणे, सदस्य विनायक राणे, सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे, योगेश मोरे व सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी सत्यवान नर यांचेकडून या निवासी संकुलात राहणाऱ्या सर्व मुलांना ब्लँकेट व खाऊ वाटप केले. जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या माध्यमातून सत्यवान नर हे महाराष्ट्रभर शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध ठिकाणी शैक्षणिक मदत करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत.
ओझरम येथील जिल्हा परिषद शाळेच्या या निवासी संकुलात मुले राहून शिक्षण घेत असून या मुलांना उज्वल भविष्य घडविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असेही यावेळी सत्यवान नर यांनी ग्वाही दिली. या मुलांना केलेल्या मदतीबद्दल दक्षता समितीकडून आभार मानण्यात आले.