*कोंकण एक्सप्रेस*
*आनंदव्हाळ रस्त्यावर ओले शेण ओतून आंदोलन छेडणार -महेश जुवाटकर*
*मालवण :प्रतिनिधी*
मालवण कसाल मुख्य रस्त्यावरील आनंदव्हाळ येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक,जनता त्रस्त बनली आहे.या रस्त्याची तत्काळ डागडुजी न झाल्यास ६ जानेवारी रोजी संबधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या निषेधार्थ या रस्त्यावर ओले शेण ओतून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर,रामा गावठे,संदेश घाडीगावकर, हेमंत सावंत यांनी दिला आहे.
दरम्यान याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
नौदल दिनाचा कार्यक्रम तारकर्ली येथे गतवर्षी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान तसेच अन्य मंत्री, वरिष्ठ अधिकारी येथे येणार असल्याने मालवण कसाल मुख्य रस्त्यावरील आनंदव्हाळ या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले होते या कामासाठी १ कोटी ३६ लाख ६८ हजार ३९७ रुपये खर्च करण्यात आले. एवढा निधी खर्च होऊनही दोन महिन्यातच हा रस्ता पूर्ण खराब झाला.या खराब रस्त्याबाबत स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर पुन्हा संबंधित ठेकेदाराने तत्काळ कारपेट घालून दिले.मात्र हा रस्ता जुलै महिन्यात पुन्हा खराब झाला. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे हा रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. या नवीन रस्त्याची दोन वेळा डागडूजी करण्यात आली असतानाही या रस्त्यातील खडी निघाल्याने दुचाकीस्वारांचे सान अपघात होत आहेत.
या संदर्भात येथील सार्वजनिक बांधकामविभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांना प्रत्यक्ष भेटून तसेच फोन द्वारे बरेच वेळा सांगण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास १० जुलै रोजी लेखी नोटीस काढली आहे. सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी साचल्यामुळे तसेच मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आतापर्यंत या रस्त्यावर ३० ते ४० अपघात झाले आहेत.
संबंधित ठेकेदारास सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावूनही अद्यापही या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटक तसेच स्थानिक जनतेला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करता या रस्त्याची तत्काळ डागडूजी होणे आवश्यक आहे. याची कार्यवाही ६ जानेवारीपर्यंत न झाल्यास या रस्त्यावर ओले शेण ओतून आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्री. जुवाटकर यांनी दिला आहे.