*कोंकण एक्सप्रेस*
*निवती समुद्रात कर्नाटक मलपीतील ट्रॉलर पकडला*
*मत्स्य व्यवसाय विभागाची धडक कारवाई*
*मालवण : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणारी कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका ‘संनिधी १’ ही सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने पकडली. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील निवती समोरील समुद्रात ही कारवाई करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी नौका सर्जेकोट बंदरात आणण्यात आली आहे.
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभरात परराज्यातील नौकांवर केलेली ही चौथी कारवाई आहे. परराज्यातील नौकांची महाराष्ट्र सागरी जलधी क्षेत्रात होणारी घुसखोरी, मासळीची होणारी लूट, स्थानिक मच्छिमारांचे होणारे नुकसान थांबले पाहिजे. याबाबत सातत्याने आवाज उठवून आक्रमक भुमिका मांडणारे आमदार निलेश राणे, मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांची सातत्यपूर्ण भूमिकाही या सर्व कारवाईत महत्वपूर्ण ठरली आहे.
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाच्या शितल नौकेतून सागरी गस्त सुरु होती. या दरम्यान परवाना अधिकारी मुरारी भालेकर, सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, रक्षक दिपेश मायबा, मिमोह जाधव, स्वप्निल सावजी, चंद्रकांत उर्फ भाऊ कुबल, दिवाकर जुवाटकर, शुभम राऊळ, पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ परब यांनी कर्नाटक मलपी येथील नौका श्री संनिधी १ क्रमांक आय एन डी के. ए ०२ एम एम ४५९४ ही महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात निवती समोर १० सागरी नॉटीकल मैल क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी नौका सर्जेकोट बंदरजेटी येथे आणण्यात आली आहे. नौकेची तपासणी, मासळीचे लिलाव व अन्य कार्यवाही सुरु होती. संबंधित नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली.