किल्ले विजयदुर्ग येथे हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा संपन्न

किल्ले विजयदुर्ग येथे हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*किल्ले विजयदुर्ग येथे हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा संपन्न*

*गड किल्ले संवर्धन समितीचे मोठे योगदान : इतिहासकालीन घराण्यांचे वंशज सहभागी*

*विजयदुर्ग : प्रतिनिधी*

भंडारा उधळून आणि छत्रपतींच्या शिवगर्जनेमध्ये तोफगाडा लोकार्पण सोहळा विजयदुर्ग किल्ल्यामध्ये मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.यावेळी इतिहासामध्ये आपल्या पराक्रमाने योगदान दिलेल्या अनेक घराण्यांचे वारसदार उपस्थित होते.

सरदार हिरोजी इंदलकर यांचे वारसदार सरदार समीरराजे इंदलकर, छत्रपती संभाजी राजांच्या दूधमाता धाराऊमाता गाडे यांचे वंशज अमितदादा गाडे पाटील, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते पाटील, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, महाराणी येसुबाई यांचे वंशज श्रीमंत दीपकराजे शिर्के तसेच सरदार आनंदराव धुळप यांचे वंशज सरदार रघुनाथराव धुळप आदींसह गडकिल्ले संवर्धन समितीचे कोकण विभाग प्रमुख शुभम राणम, समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच रियाज काझी आणि विजयदुर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.

रविवारी सकाळी 9 वाजता विजयदुर्ग डेपो येथून छत्रपती शिवरायांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. मणचे येथील डेंजर बॉईज यांच्या ढोलपथकाच्या तालावर आणि कणकवली-बीडवाडी येथील एस.एस. योद्धा पथक यांच्या दांडपट्टा आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत ही पालखी विजयदुर्ग किल्ल्यातील भवानी मातेच्या मंदिराजवळ आली. भवानीमातेचं पूजन झाल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी वर्क ऑफ कॅम्पेंक्शन ही मुस्लीम संघटनाही महाराजांच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती.

दरम्यान, सकाळी 11 वाजता शिवव्याख्याते ओंकार यादव यांनी खड्या आवाजात शिवछत्रपतींच्या जीवनावर व्याख्यान देऊन इतिहासप्रेमी आणि उपस्थितांची मने जिंकली.दोन दिवस किल्ले विजयदुर्ग येथे संपन्न झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी झालेले गड किल्ले संवर्धन समितीचे शाखाधिकारी, स्थानिक पदाधिकारी यांचा सन्मान आयोजकांनी केला.गड किल्ले संवर्धन समितीच्या कोकण विभागाने किल्ले विजयदुर्ग येथे हा भव्यदिव्य कार्यक्रम सादर करून इतिहासाला उजाळा दिला, अशा भावना विजयदुर्गवासीयांमधून व्यक्त होत होत्या.शेवटी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!