*कोंकण एक्सप्रेस*
*शास्त्रज्ञ व कृषि विभागाने केली आंबा व काजू बागांची पाहणी*
*कुडाळ : प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील गांधीनगर गावातील आंबा व काजू बागांची पाहणी करताना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॅप संशोधन सहयोगी, श्रीम. एस. एस. कविठकर कृषि पर्यवेक्षक, सोमकांत आईर कृषि सेवक यांच्यासह प्रगतशील आंबा व काजू शेतकरी उपस्थित होते.
सदर गावात एकूण २ आंबा बागांची पाहणी करताना कोणत्याही कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही.आंबा बागा मोहोर अवस्थेत असून शेतकऱ्यांनी इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के या कीटकनाशकाची ३ मिली/ली.पाणी याप्रमाणे फवारणी केल्याचे सांगितले.
बागेत किडी-रोगाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे कीड-रोगाची आर्थिक नुकसान पातळी पाहूनच पहिलीच फवारणी असल्याचे त्यांनी नमूद केले, जे वाखणण्याजोगे असून ज्यामुळे त्यांनी कीटकनाशके, मजुरी यावर होणारा खर्च वाचविला.तर काजूच्या एकूण ४ बागांचे सर्वेक्षण केले असता बागा मोहोरलेल्या अवस्थेत असून ढेकण्या किडीसाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही याची १० मिली/ली याप्रमाणात फवारणी करण्यास सूचित केले. काजूच्या रोठा किडीसाठी प्राथमिक अवस्थेत करावयाच्या उपाययोजना करण्यास उद्युक्त केले.
शेतकऱ्यांनी त्यांच्या आंबा व काजू बागेत भेडसावणाऱ्या समस्या विचारून त्यावर सखोल चर्चा केली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केलेले आंबा व काजू मोहोर संरक्षण वेळापत्रक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.