*कोंकण एक्सप्रेस*
*हिर्लोक येथील अघोरी पूजा प्रकरणातील सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता*
*कुडाळ : प्रतिनिधी*
हिर्लोक येथील अघोरी पूजा तसेच नरबळीच्या संशयावरून न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या विशाल विजय जाधव मुळ रा. हिर्लोक सध्या रा.ठाणे, सुमित मिलिंद गमरे रा. चिपळूण, हर्षाली विशाल जाधव मुळ रा. हिर्लोक सध्या रा.ठाणे, अविनाश मुकुंद संते रा. डोंबिवली, दिनेश बाळाराम पाटील रा. डोंबिवली या सर्व आरोपींची कुडाळ येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री पी आर ढोरे यांनी प्रत्येकी २५,००० रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. आरोपी क्र. १ ते ३ तर्फे अॅड अविनाश परब, अॅड सुधीर राऊळ, अॅड प्रज्ञेश राऊळ तसेच आरोपी क्र. ४ व ५ तर्फे अॅड विवेक मांडकुलकर, अॅड प्रणाली मोरे, अॅड भुवनेश प्रभुखानोलकर, अॅड वृषांग जाधव यांनी काम पाहिले.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक १८/१२/२०२४ रोजी आरोपीत क्र. १ ते ५ यांनी मिळून एकमेकाशी संगनमत करुन आरोपी क्र.१ विशाल विजय जाधव याचे घरास गृहदोष असल्याने तसेच त्याची पत्नी आरोपीत क्र. ३ हिला मुलबाळ होत नसल्याने त्याचे कुटुंबाची पिडा दूर करण्यासाठी आरोपी क्र १ याच्या अंगात येणाऱ्या देवीने सांगितल्याप्रमाणे घरात ४४ ४ X ८ फूट लांबी- रुंदी व खोलीचा खड्डा खोदून अनिष्ट प्रथेचा वापर करुन जादूटोणा करणारे साहीत्य लिंबू, पान सुपारीचे विडे, हळद, पिंजर, नारळ, फळे, फुले, तिळ, बर्फीचे पुडे, पणत्या, अबीर, डमरु, रुद्राक्ष माळ, चामडयाचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोटया काठ्या, कांबळी घोंगड्याचे तुकडे, कवडे, बिब्बे अशा साहीत्याची मांडणी करुन नरबळी अगर अन्य कोणत्या तरी अघोरी कृतीकरीता कोयता व सुरी अशी हत्यारे मांडणी केलेल्या ठिकाणी मिळून आली म्हणून फिर्यादी यांनी सरकारतर्फे दिले फिर्यादीवरुन कुडाळ पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ चे कलम ३ (१), (२), (३) सह कलम भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपीत क्र. १ ते ५ यांना दि. १८/१२/२०२४ रोजी ०२:४० वाजता अटक करण्यात आली होती.
आरोपींची न्यायलायीन कोठडीत रवानगी झाल्यावर आरोपीं तर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.आरोपी क्र. १ ते ३ तर्फे अॅड अविनाश परब तसेच आरोपी क्र ४ व ५ तर्फे अॅड भुवनेश प्रभुखानोलकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून कुडाळ येथील मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री पी आर ढोरे यांनी सर्व आरोपींची २५,००० रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.