*कोकण Express*
*फोंडाघाट वनक्षेत्रातील आदिवासी कातकऱ्यांना वनरक्षकांकडून दांड्याने बेदम मारहाण…*
*कातकरी समाजातील पुरुषांसह महिलेलाही दांड्याने झोडपले ;अखंड लोकमंचचे नामानंद मोडक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्यायाला फोडली वाचा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आदिवासी कातकरी समाजातील पुरुषांसह महिलेला फोंडाघाट वनक्षेत्रातील वनरक्षकांकडून दांड्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याविरोधात अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी आवाज उठवत पीडित कातकरी आदिवासींसह पोलिसांकडे दाद मागितली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती मोडक यांनी दिली.
कातकरी ही आदिवासी जमात असून वनाधिकार कायद्यानुसार त्यांना मूलभूत अधिकार बहाल करण्यात आले आहेत. फोंडाघाट वनक्षेत्रात काही कातकरी पुरुष आणि महिला आढळल्याने त्यांना जंगलातच वनरक्षकांनी दांड्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर फोंडा वनपाल कार्यालयात नेत तिथेही मारहाण केल्याचे मोडक यानी सांगितले. जर त्या कातकरी बांधवांकडून काही आगळीक झाली असेल तर त्यांच्यावर रीतसर कायद्याने कारवाई करण्याऐवजी त्यांना गुरासारखी मारहाण करणे कुठल्या कायद्यात बसते ? असा सवाल मोडक आणि सुदीप कांबळे यांनी विचारला आहे.कातकरी बांधवाना अमानुष मारहाण करणाऱ्या वनकायद्याचे रक्षक असणाऱ्या त्या वनरक्षकांवर ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक आणि ऍड.सुदीप कांबळे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्याकडे केली आहे. या अन्यायाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागणार असल्याचेही मोडक यांनी सांगितले. आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात ? जिल्ह्याचे डीएफओ कातकरी बांधवाना मारहाण करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांवर काय ऍक्शन घेतात ? हे महत्वाचे ठरणार आहे.