*कोंकण एक्सप्रेस*
*एनसीडीसीच्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली होईल ! – तहसीलदार वर्षा झालटे*
*मालवणातील मच्छीमारांच्या एक दिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद*
*मालवण : प्रतिनिधी*
राष्ट्रीय सहकार विकास निगम महामंडळाच्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली करता येईल असे प्रतिपादन मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले.लक्ष्मणराव इनामदार नैशनल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र एनसीडीसी पुणे,सहकार मंत्रालय,भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार व मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ नाथ पै सेवांगण मालवण येथे मच्छीमारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आयोजित कार्यशाळेला महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर,राष्ट्रीय सहकार विकास निगमचे प्रादेशिक संचालक विनीत नारायण तसेच जिल्ह्यातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक बहर महाकाळ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करुन मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी तहसीलदार झालटे यांनी विविध शासकिय योजनांचा लाभ घेऊन आपल्या संस्थेचे बळकटीकरण व विस्तार करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. नारायण यांनी सहकारी संस्थांनी पुढाकार घेऊन केंद्राच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

